नंदुरबार : ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होऊन प्रत्येकाला घरावर तिरंगा फडकवता यावा, यासाठी तिरंगा ध्वज विकत घेऊन लावण्याची क्षमता नसलेल्या गरिबांना मोफत ध्वज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मात्र, ईतरांनी विकत घ्यायचा असून त्यासाठी 20, 25 आणि 30 रुपये किमतीचे तीन प्रकारातील ध्वज बाजारात उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत, असेही त्या म्हणाल्या.
‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आज दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, पोलिस उपअधीक्षक विश्वास वळवी उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘स्वराज्य महोत्सव’, तर 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने आपले घर, इमारतीवर तिरंगा ध्वज फडकवावा. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, विद्यापीठ, महाविद्यालय, शाळा, सर्व दुकाने, आस्थापनांनी या उपक्रम स्वयंस्फूर्तीने सहभागी होवून हा उपक्रम यशस्वी करावा, तसेच ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबवितांना भारतीय ध्वज संहितेनुसार राष्ट्रध्वजाचा मान राखला जाईल व त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही याची दक्षता घेण्यात येऊन उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी सांगितले, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या महोत्सवांतर्गत सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये, विद्यापीठ, महाविद्यालये, वसतिगृह, निवासस्थान, दुकाने, आस्थापनांवर या कालावधीत राष्ट्रध्वज तिरंगा ध्वज फडकवावा. प्रत्येक विभाग, उपविभाग, विद्यापीठ, महाविद्यालय, सर्व कार्यालयाच्या वेबसाईटवर,सर्व समाजमाध्यमावर दर्शनी भागावर ‘घरोघरी तिरंगा’ ही टॅगलाईन तसेच तिरंगाचे चित्र प्रदर्शित करावे. या संदर्भात जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची वेळोवळी आढावा घेऊन प्रशासनामार्फत सर्व तयारी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात 3 लाख 75 हजार 900 घरे असून शहरी भागात 42 हजार 997 आणि ग्रामीण भागात 3 लाख 32 हजार 903 घरांचा समावेश असून एकूण 7 हजार 589 शासकीय, निमशासकीय कार्यालये, ग्रामपंचायत, शासकीय रुग्णालय, सहकारी संस्था असे मिळून जिल्ह्यात एकूण 3 लाख 83 हजार 489 घरांवर राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे. यासाठी 3 लाख 60 हजार 187 झेंडे जिल्हास्तरावरुन उपलब्ध होणार असून 19 हजार झेंडे हे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गावडे म्हणाले की, जिल्ह्यातील 595 पंचायतीमार्फत ग्रामस्तरांवर ‘घरोघरी तिरंगा ’ फडकविण्यासाठी 3 लाख ध्वजांची नोंदणी केली आहे. तसेच काही ध्वज सामाजिक दायित्व निधीतून घेण्यात येतील. ग्रामस्तरावर प्रभात फेरी, शालेय स्पर्धा, महिला बचत गट मार्गदर्शन, स्वच्छता मोहीम, महिला मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रबोधन, देशभक्तीपर कार्यक्रम, स्वराज्य फेरी आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या इमारतीवर आकर्षक विद्युत दिवे लावण्यात येणार आहे. तसेच होर्डिगच्या माध्यमातून भारतीय ध्वज संहितेची माहिती देणारे होर्डिंग प्रत्येक ठिकाणी लावण्यात येणार असून ‘घरो घरी तिरंगा’ महोत्सवांचे काही गावांचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात येणार आहे. महिला बचत गट व स्थानिक विक्रेत्यांकडून जिल्हास्तरावर ध्वज उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. विविध समाजमाध्यमातून सदर अभियान राबविण्याबाबतची जनजागृती करण्यात येत आहे. शाळा व महाविद्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस विभाग व स्वस्त धान्य दुकानदार यांच्यामार्फत अभियान यशस्वी करण्याचे नियोजन करण्यात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पोलिस उपअधीक्षक विश्वास वळवी यांनी पोलीस विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती यावेळी दिली.