नंदुरबार : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नवापूर शहरात आज जिल्हा पोलीस दल नंदुरबार, नवापूर तालुका प्रशासन व दैनिक पत्रकार संस्था यांच्या वतीने 1 हजार 107 फुट लांब व 10 फुट रुंद असलेल्या भव्य तिरंगा रॅली संपन्न झाली. शहरातील रस्ते व्यापणाऱ्या या भव्य तिरंग्याचा अद्भुत नजारा अनुभवताना नवापूरवासी अक्षरशः भारावून गेले.
ड्रोनच्या सहाय्याने याची विविध सुंदर दृश्ये टिपून त्या संस्मरणीय क्षणांना पोलीस दलाने कैद केले आहे. या रॅलीसाठी राहुल टिभे यांनी १ हजार १०७ फुट लांब आणि १० फुट रुंद तिरंगा उपलब्ध करून दिला होता. या भव्य तिरंगा रॅलीस जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील तसेच प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, तहसिलदार मंदार कुलकर्णी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरवात करण्यात आली.
यावेळी आमदार शिरीषकुमार नाईक, जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, तहसिलदार मंदार कुलकर्णी, जि.प.सदस्य संगिता गावीत, नगराध्यक्षा हेमलता पाटील, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, नगरपालिका मुख्याधिकारी स्वप्नील मुधलवाडकर, तालुका गटविकास अधिकारी सी.के. माळी, महिला बालकल्याण अधिकारी संजय कोंडार, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, अशोक मोकळ, मनोज पाटील विसरवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने नागरिकांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, या लढ्यातील क्रांतिकारक तसेच अज्ञात नायकांच्या घडलेल्या विविध घटनांचे स्मरण होवून वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘घरोघरी तिरंगा’ अभियानातंर्गत ही भव्य दिव्य अशी तिरंगा रॅली काढण्यात आली. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांच्या सहभागने नवापूर शहरात एक ऐतिहासिक व अभूतपूर्व असे देशभक्तीने भारावलेले वातावरण यावेळी निर्माण झाले होते. शहरातील मुख्य मार्गांवरून काढण्यात आलेल्या या तिरंगा रॅलीवर ठिकठिकाणी नागरिक महिला, पुरूषांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. रॅलीत चोखावाला लिटल एंजल्स अकॅडमी शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सजीव देखावा सादर केला होता.
शहरात सामुहिक राष्ट्रगीत गायन झाल्यावर शहरातील वरिष्ठ महाविद्यालपासून तिरंगा रॅलीस प्रारंभ होवून बस स्थानक, मेन रोड, लाईट बाजार, लिंबडा वाडी, महात्मा गांधी पुतळा, कुंभारवाडा, शिवाजी रोड, श्रीदत्त मंदिर, श्रीराम मंदिर, सरदार चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गावरुन निघुन या रॅलीचा श्री शिवाजी हायस्कुल येथे समारोप करण्यात आला. या रॅलीत नागरीक, सर्व नगरसेवक, पत्रकार, सर्व शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका तसेच सुमारे 2 ते 3 हजार विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दैनिक पत्रकार संस्थेचे अध्यक्ष मंगेश येवले तर सूत्रसंचालन भटू जाधव तर आभार तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी मानले. सामूहिक राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात आला.
00000