नंदुरबार – मुसळधार पाऊस पडत असल्याने तळोदा तालुक्यातील चांदसैली घाटरस्ता दरड कोसळून बंद पडला. यामुळे अडकलेल्या रुग्णवाहिकेतील महिला रुग्ण दगावल्याची तसेच नाल्याच्या पुरात एकजण वाहून गेल्याची दुर्घटना घडली.
अधिक वृत्त असे की नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यातील पहिला सलग मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या तीन दिवसापासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात नदी-नाल्यांना प्रथमच पूर आला आहे. प्रथमच चांगला पाऊस पडत असला तरी शेतकऱ्यांना आधीच पावसाअभावी फटका बसला होता आता सतत धार चालू असल्यामुळे पुन्हा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तापी नदीच्या पात्रात जळगाव जिल्ह्यातील हातनुर धरणाचे पाणी सोडण्यात आले त्यामुळे तापी नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असून पुराची पातळी वाढली आहे.
दरम्यान मांडवी येथे एक तरुण पुरात वाहून गेला. प्राप्त माहितीनुसार मानवानी येथील एक युवक मांडवी येथे सासुर वाडीला आला होता. ओढ्यास आलेला पूर इतरांसोबत पाहण्यास गेला असता त्याचा पाय घसरला आणि 50 फूट खाली पाण्यात पडला व पुरात वाहून गेला, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
त्याच वेळी तळोदा तालुक्यात अक्राणी मार्गांवरील चांदसैली घाटामध्ये पहाटेच्या सुमारास 100 मीटर भागात दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे धडगावकडून तळोदाकडे येणारी रुग्णवाहिका घाटात अडकली. या रुग्णवाहिकेतील एका महिला रुग्णाचा उपचारासाठी वेळेत न पोहोचल्याने मृत्यू झाला. याबाबत अधिकृत नोंद होण्याचे काम चालू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांकडून ती दरड काढण्याचे काम सुरु आहे. रात्रीपर्यंत दरड हटविण्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सांगण्यात आले आहे. प्रत्येक पावसाळ्यात या दुर्गम भागातून वाहतुकीचा प्रश्न उपस्थित होतो तसेच रस्तेे खचण्याच्या घटना घडतात म्हणून लोक संतप्त झाले आहेत. रस्त्या अभावी उपचार न घेऊ शकलेली महिला ज्या अक्राणी तालुक्यातील आहे तो आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांच्या विधानसभााा मतदारसंघातील भाग आहे. पोलीस, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.