नंदुरबार – 50 हजार रुपये दिल्याच्या मोबदल्यात चक्क सहा वर्षीय मुलाला ताब्यात ठेवून मेंढ्या चारण्यासाठी कामाला लावण्याचा हीन प्रकार नंदुरबार शहर पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने उघडकीस आणला. पन्नास हजार रुपयात मुलाची विक्री केल्याचा आरोप ठेवून संबंधित दोन जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना दिनांक 04/09/2022 रोजी याविषयी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती. म्हणून त्यांनी ताबडतोब दखल घेऊन तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर तसेच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांच्या पथकांनी मेंढपाळ व्यावसायीकाचा व अल्पवयीन बालकाचा शोध घेतला असता नंदुरबार शहरातील उप प्रादेशीक परिवहन कार्यालयासमोर असलेल्या कोळसा डेपोजवळ काही मेंढपाळ असून त्यांच्यासोबत एक अल्पवयीन बालक देखील आहे अशी माहिती त्यांना प्राप्त झाली. पथकासह तात्काळ कोळसा डेपोजवळ धाव घेतली. एक बालक काही मेंढ्यांना चारा घालत असतांना दिसून आल्याने पोलीसांनी त्यास जवळ घेवून विचारपूस केली त्यावेळेस त्या अल्पवयीन बालकाने सांगितले की, तो मुळचा मध्य प्रदेश राज्यातील राहाणारा असून त्याचा नातेवाईक मारुती याने त्यास ठेलारीकडे चारण्यासाठी दिलेले आहे.
त्यावरून आरोपी मेंढपाळ गुंडा नांगो ठेलारी वय-45 रा. भोणे ता. जि. नंदुरबार यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने अतिशय धक्कादायक माहिती दिली. त्याने सांगितले की, मारोती सोक्कर रा. गारवर्डी ता. जि. बऱ्हाणपूर मध्य प्रदेश या इसमाने 50 हजार रुपये घेवून खातला फाटा ता. जि. बऱ्हाणपूर येथील त्याच्या नातेवाईकाच्या अल्पवयीन मुलाला मेंढ्या चारण्यासाठी दिलेले आहे. त्याअनुषंगाने नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांनी तात्काळ एक पथक मध्य प्रदेश राज्यातील बऱ्हाणपूर जिल्ह्यात रवाना केले. पोलीसांच्या पथकाने गारवर्डी जि. बऱ्हाणपूर मध्य प्रदेश येथून मारोती रामा सोनकर वय- 20 रा. गारबडी ता.जि. बऱ्हाणपूर मध्य प्रदेश यास ताब्यात घेवून नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे आणण्यात आले. त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सदर मुलास 50,000/- रुपयांत मेंढपाळ व्यवसायीकाला दिले असल्याचे कबुल केले. म्हणून त्यास अटक करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.
6 वर्षीय अल्पवयीन बालकाला बाल कल्याण मंडळासमोर हजर करून त्याचे पुर्नवसन करण्यात आले असून अल्पवयीन बालकास त्याच्या आई-वडीलांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
आरोपी गुंडा नागो ठेलारी वय-45 रा. भोणे ता. जि. नंदुरबार, मारोती रामा सोनकर वय-20 रा. गारबडी ता.जि. बऱ्हाणपूर मध्य प्रदेश यांच्या विरुद् नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 570/2022 भा.द.वि. कलम 370 (4) 374 सह बाल कामगार अधिनियम 13,14 व बालकांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 75.79 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ह आरोपीताना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय पवार, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती नंदा पाटील, पोलीस उप निरीक्षक प्रवीण पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाच्या पोलीस अमलदार यांनी केलेली आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.
अल्पवयीन बालकांची कोणतीही वेठबिगारीबाबत माहिती मिळाल्यास त्वरीत पोलीस नियंत्रण कक्ष, नंदुरबार 02564-210100/ 210113येथे संपर्क साधावा, असे नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी आवाहन केले आहे.