नंदुरबार – येत्या नगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करूनच भारतीय जनता पार्टी निवडणुकीला सामोरे जाईल. तथापि, स्थानिक स्तरावरील राजकीय मतभेद अथवा विरोध याला विचारात घेऊन शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांशी बोलणी करण्याचे सर्व अधिकार भाजपच्या जिल्हा अध्यक्षांना देण्यात आले आहेत. त्यामुळे नंदुरबार येथील शिंदे गटाशी युती करावी किंवा नाही; हे जिल्हाअध्यक्ष ठरवतील मात्र, शिंदे गटाला सोबत घेऊन चालावे, हेच भाजपाचे अंतिम धोरण आहे; असेही बावनकुळे यांनी नंदुरबार येथे स्पष्ट केले.
यामुळे नंदुरबार नगरपालिकेच्या सत्ताधारी रघुवंशी गटासोबत भारतीय जनता पार्टीने निवडणुकीत युती करावी किंवा नाही, याचा अंतिम फैसला भाजपाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या भूमिकेवर अवलंबून राहील; हे आपोआपच स्पष्ट झाले आहे. पारंपारिक विरोध जारी ठेवून रघुवंशी गटाशी सामना करणारे भाजपातील उद्योजक डॉक्टर रवींद्र चौधरी, माजी आमदार शिरीष चौधरी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी आणि मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांची भूमिका यापुढे काय राहील? याची आता भाजपा कार्यकर्त्यांना उत्सुकता लागली आहे.
याची एकंदरीत पार्श्वभूमी अशी की, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असताना नंदुरबारचे माजी विधान परिषद सदस्य तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे शिवसेनेत होते. अडीच महिन्यापूर्वी शिवसेनेतून बाहेर पडत एकनाथ शिंदे यांच्या गटाने भारतीय जनता पार्टी सोबत सत्ता स्थापन केली. त्यावेळी चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. चंद्रकांत रघुवंशी यांच्या समवेत पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य काही सरपंच आणि काही नगरसेवक देखील प्रवेश करते झाले. राज्यस्तरावर शिंदे गटाची भाजपासोबत युती असल्याचे जाहीर असताना त्या प्रवेशाप्रसंगी मात्र चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार जिल्ह्यात आपली लढाई भाजपा विरोधात जारी राहील, असे जाहीरपणे म्हटले होते. परिणामी पुढील नगरपालिका निवडणुकीत चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वातील शिंदे गटाशी भाजपाची युती होणार का? पारंपारिक विरोध जारी ठेवून रघुवंशी गटाशी सामना करणारे भाजपातील उद्योजक डॉक्टर रवींद्र चौधरी माजी आमदार शिरीष चौधरी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी आणि मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचा गट रघुवंशी यांच्याशी युती करायला उत्सुक राहील का? याविषयीची उत्सुकता सर्वत्र निर्माण झाले आहे.
या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले की, देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आणि एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातील खरी शिवसेना यांची एकत्रित वाटचाल सुरू आहे. लोकसभा विधानसभा जिल्हा परिषदा आणि नगरपालिका अशा सर्व निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना जिथे जिथे उमेदवार देईल त्या उमेदवारांच्या सोबत भारतीय जनता पार्टी नक्कीच उभी राहील. हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी धोरण ठरलेले आहे. स्थानिक स्तरावरील विरोध किंवा वाद लक्षात घेऊन मेळ बसविण्याचे अधिकार भाजपाच्या जिल्हाध्यक्षांना देण्यात आले आहेत आपापल्या जिल्ह्यातील शिंदे गटाशी भाजपाचे जिल्हाध्यक्ष बोलतील. त्यानुसार नंदुरबार येथे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत राहून निवडणुका लढविल्या जातील असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी स्पष्ट केले. राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित, भाजपाचे आमदार राजेश पाडवी, माजी आमदार शिरीष चौधरी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, प्रदेश समिती सदस्य डॉक्टर शशिकांत वाणी, माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी आणि भाजपाचे सर्व प्रमुख कार्यकारणी सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.