हतनूरचे 41 तर सुलवाडेचे ऊघडले 12 दरवाजे ; तापीपात्रात 91 हजार क्युसेक्सहून अधिक विसर्ग

तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

नंदुरबार : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला असून दुपारी 3 वाजता हतनूर धरणाचे 41 दरवाजे पुर्ण क्षमतेने उघडल्याने तापी नदीपात्रात 76 हजार 993 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सुलवाडे प्रकल्पाचे 12 दरवाजे 3 मीटर उघडल्याने तापी नदीपात्रात 91 हजार 665 क्युसेक्स विसर्ग होत आहे. पुढील 72 तासात हतनूर आणि सुलवाडे प्रकल्पातून तापी नदीपात्रात मोठा विसर्ग सोडण्याची शक्यता आहे. तसेच बॅरेजच्या बाजूतील मुक्त पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होऊन प्रकल्पाच्या तसेच नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पाणीसाठा आणि विसर्गामुळे पुरस्थिती उद्भवू नये व सुरक्षिततेच्यादृष्टीने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सारंगखेडा प्रकल्पाचे 7 दरवाजे पूर्णपणे उघडून 1 लाख 37 हजार 321 क्युसेक्स व प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे 11 दरवाजे पूर्णपणे उघडून 1 लाख 41 हजार 961 क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात सुरू आहे. हतनूर धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता आहे. पाण्याचा येवा लक्षात घेता नदी पात्रात विसर्ग वाढू शकतो.

तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!