नंदुरबार: ग्रामपंचायत निकालात भाजपा वरचढ; मंत्रीपदामुळे ना.डॉ.गावितांचा जनाधार वाढला?

ग्रामपंचायत निकालाचे विश्लेषण
नंदुरबार – महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाल्यानंतर प्रथमच पार पडलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचयत निवडणूकीच्या निकालानंतर नंदुरबारसह शहादा व नवापूर विधानसभा मतदार संघात 149 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 90 हून अधिक ग्रामपंचायतींवर भाजपाचे वर्चस्व असल्याचा दावा भाजप समर्थकांनी केला. ना. डॉ. विजयकुमार गावित परिवाराचे पारडे अद्यापही मजबूत असून येथे भाजपा वरचढ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मात्र, असे असूनही भारतीय जनता पार्टीतर्फे पक्ष स्तरावरुन ग्रामपंचायत निवडणुकीतील यशाची अधिकृत माहिती अथवा अधिकृतपणे दावा करण्यात आलेला नाही.
नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यातील 74 आणि नंदुरबार तालुक्यातील 75 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच झाली. यात शहादा तालुक्यातील 74 पैकी 6 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडल्यामुळे 68 ग्रामपंचायतीचे मतदान घेण्यात आले. त्यात एकूण 1 लाख 22 हजार 515 मतदारांपैकी 92 हजार 359 म्हणजे 75.39% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नंदुरबार तालुक्यात 75 ग्रामपंचायतींपैकी 6 ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडणूक पार पडली. त्यामुळे नंदुरबार तालुक्यात 69 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचे मतदान पार पडले यात एकूण मतदार 92 हजार 351 होते. त्यापैकी 75 हजार 794 म्हणजे 82.9% मतदारांनी मतदान केले.
यातील वैशिष्ट्य असे की निवडणूक पार पडलेल्या नंदुरबार तालुक्यातील 75 ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ग्रामपंचायती या नवापूर विधानसभा क्षेत्रातील आहेत. या क्षेत्रात आदिवासी विकास विभागाचे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचे बंधू माजी आमदार शरद गावित यांचा प्रभावी संपर्क आहे. विद्यमान स्थितीत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जबाबदार पदाधिकारी असून राष्ट्रवादी पक्षाने या भागातील ग्रामपंचायतींची जबाबदारी  शरद गावित यांना सोपवली होती, असे सांगण्यात येते. मात्र तरीही भाजपाला अप्रत्यक्षपणे त्यांचा लाभ झाल्याचा सूर राष्ट्रवादी काँग्रेस मधून उमटत आहे. कारण बहुतांश ग्रामपंचायतवर मंत्री डॉक्टर विजयकुमार व त्यांचे बंधू शरद गावित समर्थकांनी झेंडा फडकवला आहे. तथापि त्या ग्रामपंचायती भाजपाच्या खात्यात गणल्या जात असून भाजपाने बाजी मारल्याचे चित्र बनले आहे.
येथील राजकारणाची आणखी दुसरी बाजू अशी की, नवापूर मतदार संघाचे विद्यमान आमदार काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष शिरीष नाईक आहेत. हा बेल्ट तसाही त्यांना पुरेसा अनुकूल नव्हता, त्यामुळे काँग्रेसला या भागात यश मिळाल्याचे दर्शवणारा निकाल लागला असता तर आश्चर्य व्यक्त केले गेले असते, असं त्या भागातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यातील 149 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीत सर्वाधिक ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पार्टी समर्थकांनी झेंडा फडकवला. ही बाब डॉक्टर विजयकुमार गावित यांना आदिवासी विकास मंत्री पद मिळाल्यानंतर भाजपाचा जनाधार अधिक मजबूत बनल्याचे दर्शविणारी मानली जाते आहे.
शिंदे गटाची मोहर उमटली
परंतु त्याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडत एकनाथराव शिंदे गटात नुकतेच गेलेले माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या गटाने नंदुरबार तालुक्यातील काही महत्त्वाच्या ग्रामपंचायतींवर सत्ता स्थापन केली. या माध्यमातून एकनाथराव शिंदे गटाने नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच खाते उघडले. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी 33 ग्रामपंचायतींवर  आल्याचे सांगतानाच भाजपचे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यावर टीका केली. भाजपाचा विजय म्हणजे आदिवासी विकास खात्याच्या योजनांचा विजय असून मतदार आणि उमेदवारांना त्या योजनांचे प्रलोभन दाखविल्याने ते भाजपाकडे वळाले, असे रघुवंशी यांचे म्हणणे आहे.
विरोधकांना आत्मचिंतनाची गरज: नामदार डॉ. गावित
दरम्यान आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “विरोधकांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे.  आदिवासी विकास विभागाच्या योजनांचे आणि लाभांचे प्रलोभन दाखवून आम्ही विजय मिळवतो असे म्हणताना मागील आठ वर्ष मंत्रिपद नसताना देखील आमदार खासदार आणि विविध पदांवर आमचे लोक निवडून येत राहिले याचा विसर त्यांना पडलेला दिसतो. 149 ग्रामपंचायतींपैकी 90 हून अधिक ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पार्टीचा ध्वज फडकला आहे यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास धोरणांचा हा विजय असल्याचे स्पष्ट होते. जिल्हा निर्मितीपासून आतापर्यंत केलेल्या विकास कामांमुळे जनाधार अजूनही आमच्या पाठीशी असल्याचा आम्हाला विश्वास आहे”
 राष्ट्रवादीला भेसळीचा फटका
कोकणीपाडा ग्रामपंचायतीत मनसे ला तीन सदस्य निवडून देता आले हा मनसेकडून केला जाणारा दावा विशेष उल्लेखनीय आहे. अडीच वर्षाची सत्ता सांभाळलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नंदुरबार तालुक्यात पुन्हा ओहोटी लागलेली दिसून आली. कारण शहादा व नंदुरबार तालुक्यात ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून काही जागा मिळाल्याचा अपवाद वगळता उद्धव यांच्या शिवसेनेच्या समर्थकांनी ग्रामपंचायतींवर वर्चस्व स्थापन केल्याचे दिसून आले नाही. काँग्रेस पक्ष देखील या स्तरावर निष्प्रभावी झाल्याचे दिसून आले. त्या उलट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 11 ग्रामपंचायतींवर दावा केला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला भेसळीचा फटका बसतो, हे पुन्हा स्पष्ट झाले. कारण अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे म्हणवले जाणारे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे की भाजपचे याचे उत्तर मिळत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजीत मोरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, मला जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्याच्या अल्पावधीत निवडणुकीला सामोरे जाताना पक्षातील मान्यवरांना प्राधान्य देणे अगत्याचे होते त्यानुसार पक्षाने त्यांना जबाबदारी सोपविले सुद्धा. ते पाहता राष्ट्रवादीच्या हातून यश का निसटले याचे उत्तर त्यांनीच द्यायला हवे.  तथापि आम्हाला काही ग्रामपंचायती राखता आल्या. येत्या काळात अधिक प्रभावी रचना करू.
शहाद्यात आमदार राजेश पाडवी, दीपक बापूंचा प्रभाव 
तिकडे शहादा तालुक्यात देखील भाजपाचाच बोलबाला आहे. भाजपाचे शहादा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी शहादा तालुक्यातील निवडणूक झालेल्या ५२ पैकी ४२ ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकल्याचा दावा केला. भाजपा जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी, आमदार राजेश पाडवी व बापुसाहेब दिपक पाटील यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा जनतेने विश्वास दाखवला, असं त्यांचे समर्थक म्हणतात. शहादा तालुक्यातील उर्वरित ग्रामपंचायतींवर काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दावा केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!