खोडाई माता यात्रौत्सवात जिल्हा पोलीस दलाने बंदोबस्तासह केल्या ‘या’ विविध उपाययोजना

नंदुरबार – नवरात्र उत्सवाला उत्सवा उत्साहात प्रारंभ झाला असून येथील प्रसिद्ध खोडाईमाता यात्रेत पहिल्या दिवसापासूनच भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. दरम्यान या गर्दीचा लाभ घेऊन कोणी अनुचित प्रकार घडवू नये यासाठी साध्या वेशातील पोलीस नेमणे,  यात्रेच्या ठिकाणी तात्पुरती चौकी उभारणे पाणपोईची व्यवस्था करणे अपंग आणि वृद्धांसाठी तात्पुरते प्रतीक्षालय उभारणे यासारख्या विविध उपाय योजना नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आल्या असून जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. 
महिला अंमलदाराच्या हस्ते चौकीचे उद्घाटन
नवरात्रौत्सवच्या अनुषंगाने नंदुरबार शहरातील खोडाई माता मंदिर येथे यात्रौत्सव आयोजित करण्यात येत असतो. यात्रौत्सवाच्या कालावधीत मंदिरामध्ये भाविक विशेषत: वयोवृध्द व्यक्ती, स्त्रिया, पुरुष, लहान मुले / मुली इत्यादी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात. यात्रोत्सव कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आज दिनांक 26/09/2022 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी दिनांक 26/09/2022 ते दिनांक 05/10/2022 दरम्यान भाविकांच्या मदतीसाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे तात्पुरत्या स्वरुपातील सुसज्ज अशा पोलीस चौकीचे उद्घाटन नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अमलदार सविता तडवी यांचे हस्ते करण्यात आले.
महिला, बाल व वृद्धांसाठी कक्ष
मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर व यात्रौत्सवात येणारे वयोवृद् व्यक्ती व दिव्यांग व्यक्तींची गैरसोय टाळण्याकरीता तसेच त्यांचे उन्हापासून संरक्षण व्हावे, याकरिता त्यांच्यासाठी स्वतंत्र मंडप व खुर्च्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, जेणेकरुन वयोवृद्ध व्यक्ती व दिव्यांग व्यक्ती अल्प विश्रामासाठी थांबतील व त्यांना दर्शनाचा तसेच यात्रौत्सवाचा आनंद घेणे शक्य होईल.
 पोलीस दलातर्फे पाणपोईचीही व्यवस्था
संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील भाविक खोडाई माता मंदिरात मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. सर्वांना पैशाअभावी पिण्याच्या पाण्याची बाटली घेणे शक्य होत नाही. अशा सर्व भाविकांसाठी स्वच्छ पाण्याची सोय व्हावी व त्यांना निःशुल्क पाणी उपलब्ध व्हावे, याकरीता नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे स्वच्छ व निःशुल्क पाणपोईची सोय भाविकांना उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
मंदिर व यात्रौत्सवात येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होवू नये, याकरिता चोरांपासून सावधान राहा, मौल्यवान दागिने सांभाळून ठेवा, प्रसार माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या खोट्या बातम्या / अफवा यांचेवर विश्वास ठेवू नये. तसेच इतर आशयाचे बॅनर्स देखील नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे मंदिर व यात्रा परिसरात लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही.
दामिनी पथकाची नेमणूक
मंदिर व यात्रौत्सव दरम्यान गर्दीच्या ठिकाणी मुलीची किंवा महिलांची छेड काढण्याचे प्रकार काही टवाळखोर युवकांकडून होत असतात. अशा घटना टाळण्यासाठी महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अमंलदार यांचे दामिनी पथके तयार करण्यात आलेली आहेत. तसेच मंदिर व यात्रौत्सव दरम्यान गर्दीच्या ठिकाणी महिलांचे मौल्यवान दागिने चोरी होवू नये, म्हणून साध्या वेशातील महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अमलदार यांचे विशेष पथके देखील तयार करण्यात आलेली आहेत.
यात्रौत्सवादरम्यान विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली असून विविध ठिकाणी वाहने थांबविण्यास मनाई केलेली आहे. याबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी स्वतंत्र परिपत्रक काढले असून त्याची माहिती प्रसार माध्यमांद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना देण्यात आली आहे
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी यात्रौत्सव दरम्यान महत्वाच्या ठिकाणी उभारण्यात येणारी बॅरिकेटिंगची पाहणी करुन योग्य त्या सुचना दिल्या. तसेच बंदोबस्ताची आखणी कशा प्रकारे असेल याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना व यात्रोत्सवादरम्यान पोलीस प्रशासनास मदत करणाऱ्या 60 स्वयंसेवकांना देखील मार्गदर्शन केले.
सदर वेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांचेसह नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. भरत जाधव, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुनिल नंदवाळकर, पोलीस निरीक्षक श्री. अर्जुन पटले व इतर पोलीस अधिकारी तसेच पोलीस अमंलदार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!