नंदुरबार: जिल्ह्यातून 19 जण हद्दपार; प्रथमच मोठी कारवाई

नंदुरबार  – येथील २ टोळ्यातील १४ जण २ वर्षासाठी तर शहादा येथील एका टोळीतील ५ इसम १ वर्षासाठी जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्याच्या स्थापनेपासून एकाच वेळी १९ इसमांना हद्दपार करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आगामी गणेशोत्सव व नवरात्रोत्सव काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी याकरीता नंदुरबार जिल्ह्यातील ३ गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण १९ इसमांना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ५५ च्या अधिकारान्वये नंदुरबार जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याचे आदेश आज दिले आहेत.
नंदुरबार शहरात तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी बाधा ठरणाऱ्या इसमांना त्यांचेवर दाखल गुन्ह्यांचा आढावा घेवून त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करावी याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले होते. त्यावरुन नंदुरबार शहर पोलीस ठाणेकडून ०२ टोळ्या व शहादा पोलीस ठाणेकडून ०१ टोळीस हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात प्राप्त झाला होता. सदर हद्दपार प्रस्तावांची छाननी करुन योग्य कायदेशीर प्रक्रिया पार पाडून ०३ गुन्हेगारी टोळ्यातील १९ इसमांना हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक, नंदुरबार महेंद्र पंडित यांनी दिले आहेत. नंदुरबार शहर हद्दीत राहणाऱ्या दोन गुन्हेगारी टोळीतील १४ इसमांविरुध्द् शरीराविरुध्दचे गंभीर गुन्हे दाखल असुन शहादा तालुका हद्दीत राहणाऱ्या एका गुन्हेगारी टोळीतील ०५ इसमांविरुध्द् मालमत्ते विरुध्दचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

नंदुरबार शहर हद्दीत राहणारे पप्पु ऊर्फ फारुख खान जहिर खान कुरैशी, नायाब खान जहिर खान कुरैशी, फिरोज खान जहिर खान कुरैशी, सिकंदर खान जहिर खान कुरैशी, राजु ऊर्फ फिरदोस खान जहिर कुरैशी, मुश्तकीन शेख शहाबुद्दीन कुरैशी, शेख इस्तीयाक अ हाजी अब्दुल रज्जाक, शेख अब्दुल रशिद शेख अब्दुल रज्जाक कसाई, शेख अल्ताफ शेख जमिल कुरेशी, शेख कलिम शेख जमिल कुरैशी, शेख जुबेर शेख मुश्ताक कुरैशी, रियाज अहमद मुश्ताक अहमद कुरैशी, निहाल अहमद शेख अश्पाक कुरैशी, शेख शकिल शेख इसाक कसाई यांचा समावेश आहे. तर शहादा पोलीस ठाणे हद्दीतील महेंद्र धरम ठाकरे, आझाद विठ्ठल ठाकरे, मंगल शंकर ठाकरे, गोरख मोहन ठाकरे, शामा सरदार ठाकरे सर्व डामरखेडा ता. शहादा अशी हद्दपार करण्यात आलेल्या इसमांची नावे आहेत.

हद्दपार आदेशाची अमंलबजावणी तातडीने करण्यात येत असून हद्दपार इसमांनी आदेश प्राप्त झाल्यावर ४८ तासाच्या आत तातडीने जिल्हा हद्दीबाहेर निघून जावे, असे आदेश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यांचे विरुध्द् प्रचलीत कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही पोलीस प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!