भरत गावित यांच्या परिवर्तन पॅनलची सरशी; आदिवासी साखर कारखाना निवडणूक निकाल

नंदुरबार – नवापूर तालुक्यातील डोकरे आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या प्रथमच पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे भरत माणिकराव गावित यांच्या परिवर्तन पॅनलचे उमेदवार 14 जागांवर विजयी झाले यामुळे भरत गावित गटाची भाजपा पुरस्कृत सत्ता साखर कारखान्यात स्थापन झाली आहे.

“परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे त्यानुसार आदिवासी सहकारी साखर कारखान्यात वर्षानुवर्ष चालत आलेला कारभार बदलण्यासाठी मतदारांनी आमच्या पॅनलला विजयी केले असून परिवर्तन घडवले आहे आमच्या परिवर्तन पॅनलला मतदान करून विश्वास दर्शवला, हीच स्वर्गीय माणिकराव गावित यांना खरी श्रद्धांजली आहे म्हणून त्या सर्व सभासदांचे आभार मानतो”, अशी प्रतिक्रिया परिवर्तन पॅनलचे प्रमुख भरत माणिकराव गावित यांनी दिली.

 तीस वर्षांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री स्वरूप सिंग नाईक आणि स्वर्गीय मंत्री माणिकराव गावित यांनी नवापूर तालुक्यात डोकारे येथे पहिला आदिवासी सहकारी साखर कारखाना स्थापन केला. कारखाना स्थापनेपासून संचालक मंडळाची निवडणूक पाच वेळा बिनविरोध झाली होती. मात्र, आता 25 वर्षानंतर म्हणजे या सहाव्या पंचवार्षिकनिमित पहिल्यांदाच कारखान्याच्या निवडणूकीत मतदानाचा प्रसंग उद्भवला. यात थेट राजकीय गट सक्रिय दिसले. गावित आणि नाईक परिवार एकमेकांसमोर उभे असून, सत्ता कोण काबीज करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष आमदार शिरीष नाईक यांचे शेतकरी विकास पॅनल व भाजपाचे भरत गावित यांचे परिवर्तन पॅनल यांच्यात ही सरळ लढत झाली. संचालकांच्या १७ जागांपैकी शेतकरी विकास पॅनलचे २ उमेदवार आधीच बिनविरोध झाले आहेत़. १५ जागांसाठी पाच गटांत मतदान झाले. काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे १५, तर भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलच्या १४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होते.आज रविवार दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वाजेपासून सुरू झालेली ती थेट रात्रीच्या आठ वाजे नंतरही चालूच होती. एकूण ९,७१९ पैकी ५,१३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एका मतदाराला 7 बॅलेट पेपर हाताळायचे म्हटल्यावर कर्मचाऱ्यांना किती कागद मोजावे लागले, याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. परिवर्तन पॅनल चा विजय घोषित झाल्यानंतर रात्री भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!