नंदुरबार – तालुका विधायक समितीचे विधी महाविद्यालय नंदुरबार येथे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.असीम सरोदे यांचे
“संविधान एक धोरण- व नैतिकता” या विषयावर सोमवार दिनांक २ जानेवारी रोजी व्याख्यान झाले. ॲड.असीम सरोदे यांच्या मते देशातील सद्यस्थितीतील राजकीय परिस्थिती लक्षात घेता संविधानानुसार बोलणे अडचणीचे झालेले आहे. शासनाचे धोरण म्हणून भारतीय संविधान लागू करणे अपेक्षित असताना विपरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे. एकीकडे नागरिकांना नागरिकांचे संविधानिक अधिकारांबाबत जागृत करणे आवश्यक असताना दुसरीकडे मात्र नागरिकशास्त्र सारख्या विषयाचे महत्त्व शाळा महाविद्यालयातून कमी केले जात आहे. राजकारणी लोकांचे नागरिकांनी किती ऐकावे हे ठरविण्याची वेळ देशात आली आहे असे मत मांडले.
देशामध्ये अनेक महत्त्वाच्या घटना घडत असताना केवळ ज्या घटनांचे राजकारण होऊ शकते त्याच घटना प्रसारमाध्यमांद्वारे समाजासमोर आणल्या जातात हे दुर्दैव आहे. नागरिकांनी देखील आपला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना समोरच्या नागरिकाचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा देखील मान राखणे आवश्यक आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसार माध्यमांचा भूमिकेत खूप बदल झालेला आहे. पूर्वी प्रसारमाध्यमाचा संपादकाना स्वतंत्रता होती जी काढून घेण्यात येऊन ती स्वतंत्रता आता केवळ प्रसारमाध्यमाच्या मालकांकडे आलेली आहे हे लोकशाहीला घातक आहे. विद्यार्थ्यांना शाळेपासूनच प्रश्न विचारण्याची सवय लावली गेली पाहिजे जेणेकरून पुढे तो नागरिक झाल्यावर आपल्या अधिकाराचा रक्षणासाठी तो प्रशासनाला प्रश्न विचारू शकतो. मात्र प्रश्न विचारण्याची पद्धत समाजात संपलेली आहे. राजकारणी निवडणुकांचा अगोदर जसे आचारसंहितेनुसार बोलतात तीच आचारसंहिता त्यांना निवडून आल्यानंतर पाच वर्षे लागू केली पाहिजे. राजकारण्यांकडून जी बेजबाबदार वक्तव्य केली जातात त्यावर कायदा निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे ही मत मांडले. महिलांच्या सुरक्षेसाठी कायदे करून उपयोग होणार नाही त्यांच्या सन्मानासाठी कायदे करणे आवश्यक आहे. धर्म व जातीच्या दुरुपयोग राजकारण्यांकडून होत असतो म्हणूनच नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे. आपल्या देशात थोर विचारवंतांना विविध विशेषणे देऊन त्यांचे पुतळे उभारून जी लोक या विशेषणांचा वापर करतात, दुर्दैवाने तेच लोक त्या विचारवंतांच्या विचारांवर चालत नाही हे खेदजनक आहे.
ॲड.असीम सरोदे यांचा व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले ज्यात महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष व राज्यघटना, मा.सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीश नियुक्ती संदर्भातील न्यायिक आयोग, राज्यपाल व शासन यांच्यातील संघर्ष यावर त्यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. एन डी चौधरी यांनी व्याख्यानाच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील विधी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संवादाची एक चांगली संधी मिळाली म्हणून समाधान व्यक्त केले. सूत्रसंचालन नॅक समन्वयक डॉ. एस.एस.हासानी यांनी केले. कार्यक्रमात संस्थेचे समन्वयक डॉ. एम एस रघुवंशी, प्राचार्य पुष्पेन्द्र रघुवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. डी चौधरी सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.