नंदुरबार : दिल्ली येथे सुरू असलेल्या दोन दिवसीय परियोजना संचलित ब्लॉक पंचायत विकास योजना आणि जिल्हा पंचायत विकास योजनाअंतर्गत राष्ट्रीय कार्यशाळा पार पडली.
या कार्यशाळेत जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी सहभाग नोंदवत जिल्ह्यातून कुपोषण समूळ नष्ट करण्यासाठीच्या प्रयत्नांची माहिती दिली. यावेळी त्यांनी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा केली. कार्यशाळेत जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. गावित यांनी, जिल्ह्यातील कुपोषण कमी करण्यासाठी जिल्हा परिषद केंद्र सरकारच्या अमृत आहार योजना प्रभावीपणे राबवत आहे. जिल्ह्यातून स्थलांतरित कुटुंबांची
माहिती घेऊन ज्या ठिकाणी ते गेले आहेत. तेथील जिल्हाधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून लहान बालकांना पोषण हार पुरवल्याची माहिती दिली. नंदुरबार जिल्हा कुपोषणाच्या नावाने ओळखला जातो. मात्र, आता कुपोषण कमी करण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्न करत असून, लवकरच जिल्ह्यातील कुपोषण हद्दपार करणार असल्याचे सांगितले.
जिल्ह्यातील बचत गटांसाठी राबवण्यात येणारे उपक्रम, जिल्हा परिषद आपल्या दारी हा उपक्रम आदींची माहितीही त्यांनी कार्यशाळेत दिली. त्यांच्या या प्रयत्नांचे केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाकडून आणि देशातील विविध ठिकाणाहून आलेले जिल्हा परिषदांचे प्रतिनिधी आणि जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कौतुक करत आपापल्या जिल्ह्यात कुपोषण आणि स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.