श्रमदान करीत युवकांनी केली महाराणा प्रताप पुतळा परिसराची स्वच्छता

नंदुरबार – शहरातील काही युवकांनी स्वच्छता मोहीम राबवत राष्ट्राप्रती आणि धर्माप्रती अपार निष्ठा राखताना प्राण अर्पण करीत समर्पणाचे उच्चतम आदर्श उदाहरण बनलेले वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंग यांचा घाणीच्या साम्राज्यात वेढला गेलेला पुतळा मुक्त आणि स्वच्छ केला.
 पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला शहरातील युवकांकडून श्रमदान करून शहरातील बस स्थानकाजवळील  वीरशिरोमणी महाराणा प्रताप यांच्या स्मारक आवारातील काटे, झुडपे आणि घाण स्वच्छ करण्याचे हे कार्य करण्यात आले. नंदुरबार शहरात बस स्थानकाजवळील चौकात हा पूर्ण कृती भव्य अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आलेला आहे तथापि त्या पुतळ्याकडे आणि या स्मारकाच्या भोवताली केल्या जाणाऱ्या अनुचित प्रकारांकडे कायम दुर्लक्ष केले जाते परिणामी तिथे बऱ्याच प्रमाणात घाण साठलेली दिसते.
दरवर्षी पुण्यतिथी निमित्त महाराणा प्रतापसिंग यांच्या स्मारकाला शहरातील नागरिकांमार्फत अभिवादन करण्यात येते. केवळ त्याप्रसंगी स्वच्छता राबवली जाते. तथापि पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला आज दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी काही युवकांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने श्रमदान करीत स्वच्छता राबवली आणि हाच अभिवादनाचा भाग असल्याचे दर्शवून दिले. नंदुरबार शहरातील दिग्विजयसिंग राजपूत, भूषण राजपूत, विवेक पाटील, राहुल गिरासे व डॉ.वरूण गिरासे यांचा यात सहभाग होता.
दरवर्षी अशाच प्रकारे महापुरुषांच्या पुण्यतिथी व जयंतीच्या पूर्वसंध्येला श्रमदान करण्याचा निश्चय देखील संबंधित युवकांमार्फत याप्रसंगी करण्यात आला. यापुढील श्रमदानात जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन या युवकांत तर्फे करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!