35 खून प्रकरणांसह 5578 गुन्हे केले उघड; नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची वर्षभरातील कामगिरी

नंदुरबार – जिल्ह्यात सन 2022 मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत एकुण 6084 गुन्हे दाखल झाले होते त्यापैकी 5578 गुन्हे उघडकीस आणण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला यश आले असून दाखल गुन्ह्यांपैकी उघडकीस गुन्ह्यांचे प्रमाण 92 टक्के आहे. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे गुन्हे शाबितीचे प्रमाण देखील 38 टक्के आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

सन 2022 मध्ये नंदुरबार जिल्ह्यात खूनाचे एकुण 35 गुन्हे 35 गुन्हे दाखल झाले होते त्यापैकी 35 गुन्हे उघडकीस आणण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला यश आले असून खूनाच्या दाखल गुन्ह्यांपैकी उघडकीस गुन्ह्यांचे प्रमाण 100 टक्के आहे. त्याचप्रमाणे खूनाचा प्रयत्न करण्याचे 35 गुन्हे घडले असून सर्व गुन्हे उघडकीस आले आहेत. मालमत्तेविरुध्दचे दरोड्याचे 09 गुन्हे दाखल असून सर्व गुन्हे उघडकीस आहेत. तसेच एकुण मालमत्तेविरुध्दचे 873 गुन्हे दाखल असून 246 गुन्हे उघडकीस आलेले असून 43,54,521 रुपये किमतीची चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे दुःखापतीचे 268 गुन्ह्यांपैकी 268 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. सन 2022 मध्ये बलात्कार, विनयभंग व इतर महिलांविरुध्दचे असे एकुण 333 गुन्हे दाखल गुन्ह्यांपैकी 321 गुन्हे उघडकीस असून त्याचे प्रमाणे 97 टक्के आहे. महिलांविषयक दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांची निर्गती करण्यात आलेली आहे. फसवणूकीच्या 40 दाखल गुन्ह्यांपैकी 37 गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

अवैध दारु, जुगार, गांजा इत्यादी अवैध धंद्यांविरुध्द् देखील नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने सन 2021 च्या तुलनेत भरीव कामगिरी केलेली असून सन 2021 मध्ये अवैध दारु, जुगार इत्यादी अवैध धंद्यांविरुध्द् 2328 गुन्हे दाखल करुन 3 कोटी 91 लाख 67 हजार 263 रुपये किमतीची दारु, जुगार व इतर साधने जप्त करण्यात आलेली आहेत. सन 2022 मध्ये 2584 अवैध धंदे करणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करुन 5 कोटी 89 लाख 81 हजार 032 रुपये किमतीची दारु, जुगार व इतर साधने जप्त करण्यात आलेले आहेत. NDPS कायद्यांतर्गत 08 गुन्हे दाखल करुन त्यांच्या ताब्यातून 38 लाख 32 हजार 222 रुपये किमतीचा गांजा, अफुची बोंड, चुरा इत्यादी जप्त करण्यात आला आहे.

ही माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत दाखल गुन्हे उघड करण्यावर नंदुरबार जिल्हा पोलीस दल भर देत असून, गुन्हेगारीला आळा बसावा याकरीता नंदुरबार जिल्हा पोलीस दल वेगवेगळ्या उपायोजना करीत आहेत. तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!