जळखे आश्रमशाळेतील चिमुकल्यांना प्रकल्पाधिकारी मीनल करनवाल यांच्या साधेपणाने घातली भुरळ

नंदुरबार – नुकतीच आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार प्रकल्पाधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांनी डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित अनुदानित आश्रमशाळा जळखे ता. नंदुरबार येथे नुकतीच भेट दिली. त्याप्रसंगी उच्च अधिकारी असल्याचा कुठलाही अहंकार न ठेवता त्या क्षणभरातच चिमुकल्यांच्या विश्वात हरवून गेल्या आणि चक्क जमिनीवर अंथरलेल्या सतरंजीवर बसकन मारून विद्यार्थ्यासमवेत खाली बसूनच त्यांनी दिलखुलास संवाद साधला. त्यांचा तो साधेपणा आणि लहानग्या मुला मुलींचा आत्मविश्वास वाढवणारे सहज भावातील वर्तन पाहून उपस्थित शिक्षक शिक्षिका आणि कर्मचारी सुद्धा अचंबित झाले.

 

एरवी कोणताही अधिकारी शाळेत भेटीला गेल्यावर संस्थाचालक आणि शिक्षक यांच्या मनावर ताण निर्माण होतो. भेटीला आलेल्या अधिकाऱ्यांच्या साहेबी थाटातील वर्तन मुलांना प्रचंड दडपण आणणारे असते परंतु याच्या उलट अनुभव प्रकल्पाधिकारी मीनल करनवाल यांनी दिला. सर्वप्रथम एका वर्गात त्यांनी प्रवेश केला आणि विद्यार्थ्यांना अगदी सहजपणे सामोरे गेल्या. त्यांना बोलत करण्यासाठी चक्क जमिनीवर मांडी घालून बसल्या आणि प्रेमळ संवाद करत गेल्या. मुला मुलींच्या कधी गोंधळलेपणातून तर कधी बालसुलभपणातून तर कधी चाणाक्षपणातून येणाऱ्या उत्तरांमधील गम्मत जम्मत अनुभवताना काही वेळ त्या हरवूनच गेल्या.

पुढे जे घडले ते असे-

“आज मोर्चा होता तुम्हाला माहित आहे का?” मॅडम.

“हो.”.. प्रश्न न कळल्यामुळे इयत्ता तिसरीतील चिमुकलीचे घाईघाईने उत्तर.
तिच्या बाळबोध उत्तराला मॅडम हसून दाद देतात.

“बेरजेचे उदाहरण कोण पटकन सोडवितो?” मॅडम.

नारायणचा हात उंचावतो.. मॅडम त्याच्याकडे वही देतात.. आणि नारायण प्रचंड एकाग्रतेने उत्तर सोडवितो.

“अरे ..वा !”
नारायणचे बरोबर उत्तर बघून प्रकल्प अधिकारी मॅडम प्रचंड खुश होतात.

“कोणा कोणाला माझ्यासोबत सेल्फी काढायची आहे?”

कदाचित सेल्फी या शब्दाचा अर्थ न समजल्यामुळे घाबरलेले चेहरे हात उंचावण्यास धजावत नाहीत.. अशातच काही थोड्याशा धीट चेहऱ्यांना मॅडम बरोबर हेरतात.. त्यांना जवळ बोलावून आपल्या मांडीवर अतिशय प्रेमाने बसवत सेल्फी काढतात…

अर्णव, नारायण आणि प्रेम यांना आपल्या कार्यालयात यायचे आमंत्रण देऊन वर्गाचा निरोप घेतात.

वाऱ्याच्या वेगाने पुढच्या वर्गात प्रवेश..
इथे प्रश्नउत्तराने संवाद सुरू… मनासारखी अपेक्षित प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर मॅडम पूजाला टाळी देतात.
“मॅडम ही पूजा तुमची वाट बघतच होती..” वर्गशिक्षक.
“अरे वा पूजा ,सांग बर माझं नाव? ”
“मी..न..ल.. करन..वा ल..” आपले डोळे घट्ट मिटत उघडत पूजा उत्तरली..
चिमुकलीचे बरोबर उत्तर ऐकून मॅडम, मुख्याध्यापक आणि शिक्षक अवाक..!
“तुला माझे नाव कस माहित..?” कुतुहलाने भरलेला प्रश्न.

“आमच्या शाळेच्या भिंतीवर लिहिलेले आहे?”
पूजा आता काहीसी धीट झाली.
प्रचंड आनंद प्रकल्प अधिकारी यांच्या चेहऱ्यावर दिसतो…
पूजा आता सेल्फीला पात्र होते..
खरंतर प्रकल्प अधिकारी मॅडम यांना विद्यार्थ्यांशी खूप गप्पा करायच्या होत्या, परंतु पुढील मिटींगला उशीर होऊ नये म्हणून त्या घड्याळाकडे बघत निघाल्या..
मॅडम आता आपल्या वर्गात येणार नाही हे बघून बाकीचे चिमुकले ओट्यावर आले आणि सगळ्यांनी एकच गलका केला “मॅडम, आमच्या वर्गात पण या ना..!

वेळेअभावी सर्व वर्गांमध्ये जाऊ शकत नाही.. आणि चिमुकल्यांना नाराज देखील करू शकत नाही.. हा गुंता मॅडम साऱ्यांसमवेत फोटो काढून सोडवितात.. अन‌ गाडीकडे वळतात.. अविस्मरणीय आनंददायी अशा या भेटीला शाळा आणि मॅडम मोरपिसासारखे निश्चितच
जपून ठेवतील.. कधीही न विसरण्यासाठी..!

जळखे आश्रमशाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक प्रमोद सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!