नंदुरबार – व्हाइटनर लावून जमीन मालकीच्या बनावट फेरफार नोंदी करून तसेच बनावट प्रमाणपत्र बनवून देत मूळ जमीन मालकाची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल असलेल्या एका गुन्ह्यात नंदुरबार मधील बहुचर्चित तलाठी आप्पाचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला आहे. नंदुरबार मधील अनेक बड्या राजकीय हस्तींचा वरदहस्त लाभलेला हा तलाठीआप्पा नंदुरबार मधील असंख्य बोगस जमीन प्रकरणांशी संबंधित असल्याची चर्चा आहे. प्रशासनातले आणि राजकारणातले बड्या हस्ती त्याच्या बोगसपणाच्या लाभार्थी असल्याचे देखील म्हटले जाते. परंतु आजपर्यंत एकही प्रकरण रेकॉर्डवर येऊ न देण्याची बौद्धिक कसरत करण्यात ही साखळी यशस्वी झाली असून अनेक जमिनी गिळंकृत केल्याचे जाणकार म्हणतात. तथापि नंदुरबार तालुक्यातील भोणे गावातील फेरफार नोंदीचे एक प्रकरण या तलाठी आप्पाच्या चांगलेच अंगाशी आले असून पहिल्यांदाच गुन्हा नोंद होण्यापर्यंत प्रकरण पोहोचले. कोणालाही झुकवता येते, ही मिजास ठेवून असलेल्या आप्पाला त्यातून वाचण्यासाठी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन साठी अर्ज करावा लागला. न्यायालयाने तो फेटाळून लावला. त्यांनी लगेचच उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. परंतु उपलब्ध पुरावे लक्षात घेता खंडपीठाने सुद्धा अटकपूर्वक जामीन अर्ज फेटाळून लावल्याचे वृत्त आहे. परिणामी नंदुरबारच्या भूमाफियांमध्ये भूकंप आल्यागत स्थिती निर्माण झाल्याचे म्हटले जाते. कारण या प्रकरणाच्या खोलात जाऊन शासकीय यंत्रणेने अधिक चौकशी करू म्हटल्यावर शेकडो एकर जमिनीचा घोटाळा उघड होण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते. म्हणून याप्रकरणी सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यासाठी अनेकजण सरसावले आहेत.