नंदुरबार – नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.श्री.बी.जी. शेखर पाटील यांच्या हस्ते ” पोलीस आरोग्य व संवर्धन या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या वैद्यकीय शिबीराचे उद्घाटन नुकतेच पार पडले त्या प्रसंगी जिल्हा पोलीस दलाच्या वैद्यकीय तपासणी शिबिराच्या माध्यमातून नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य संतुलन राखण्याचे अभियान जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून चालवले जात असल्याबद्दल गौरवोद्गार काढले व अभियानाचे कौतुक केले.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. श्री.बी.जी. शेखर पाटील हे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी नंदुरबार येथे आले होते. त्याप्रसंगी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या ” पोलीस आरोग्य व संवर्धन या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या वैद्यकीय शिबीराचे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. डॉ. श्री बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी केलेल्या प्रमुख भाषणात त्यांनी सांगितले की, पोलीस दलाचे कामकाज हे आव्हानात्मक असून दैनंदिन कामकाज करतांना पोलीसांवर वेगवेगळ्या प्रकारे तणाव येत असतो. त्या शारीरिक व मानसिक तणावातून मार्ग काढून सकस आहार व योग्य व्यायाम याद्वारे आपण व्याधींपासून दूर राहू शकतो.
मागील काही वर्षापासून जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांचेसाठी तातडीने व चांगल्या उपचारासाठी नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णालयाशी करार नसल्याने जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना उपचारासाठी शेजारच्या धुळे अथवा इतर जिल्ह्यात जावे लागत होते. नंदूरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी अधिकारी व अंमलदार यांची अडचण लक्षात घेवून नंदुरबार शहरातील स्मीत मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटलसोबत महात्मा फुले कुटुंब आरोग्य योजनेंतर्गत (MPKAY) नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचा करार करून जिल्ह्यातील अधिकारी व अंमलदार यांची आरोग्य विषयक महत्वाची अडचण नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी दुर केली. अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या आरोग्याच्या बाबतीत सजगतेने काम करीत असल्याबाबत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांचे कौतूक केले.
दरम्यान, जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार तसेच त्यांच्या परिवारातील सदस्य यांच्यासाठी पोलीस आरोग्य व संवर्धन या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. यात जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार व त्यांच्या परिवारातील सदस्य यांची मोफत नेत्र तपासणी करून दृष्टीदोष असणा-यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले आहेत. तसेच तपासणी दरम्यान मोतीबिंदू असणाऱ्या 5 अंमलदारांचे मोतीबिंदूचे मोफत ऑपरेशन प्रस्तावित करण्यात आले आहे. याच अभियानाचा भाग म्हणून नंदुरबार जिल्हा पोलीस दल व नारी संस्था, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाममात्र शुल्क आकारून हिपॅटायटीस – A व B या लसोचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे.
या अभियानाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणून आज पावेतो जिल्हा पोलीस दलातील एकूण 1218 पोलीस अधिकारी व अंमलदार यांची स्मित हॉस्पीटल मार्फत मोफत रक्त तपासणी करण्यात आली होती. मोफत रक्त तपासणी केल्यानंतर ज्या अधिकारी व अंमलदार यांना हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह, पाठ, कंबर आणि मणकेदुखी तसेच रक्तासंबंधी आजार (HB, अनिमीया ) निष्पन्न झाले आहे. त्यांच्या सखोल वैद्यकीय तपासणी शिबीराची सुरुवात आज पासून करण्यात आली.
‘पोलीस आरोग्य व संवर्धन या अभियानांतर्गत अधिकारी / अंमलदार यांची पूर्ण शारीरिक तपासणी होवून प्रत्येकाची वैयक्तीक आरोग्य विषयक माहिती (Medical Profile File) संकलीत करून प्रत्येक पोलीस अधिकारी / अंमलदार यांची एक फाईल पोलीस अधीक्षक कार्यालयात ठेवण्यात येणार आहे व त्या आधारे प्रत्येक पोलीस अधिकारी अंमलदार यांची शारीरिक मानसिक क्षमता निश्चितक रून त्यानुसार भविष्यात कामकाजाचे मूल्यमापन व नियोजन करण्याचा मानस असल्याचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सांगितले,
या अभियानात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला मदत करणान्या स्मित हॉस्पीटलचे संचालक डॉ. विजय पटेल, डॉ. तेजल चौधरी, डॉ. शब्बीर मेमन, व्यवस्थापक डॉ. भरत पटेल तसेच तेथील कार्यरत डॉ. रोहित पटेल व डॉ. कल्पेश चौधरी यांचे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. या प्रसंगी डॉ. विजय पटेल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात 30% पेक्षा अधिक पोलीसांना आरोग्याच्या समस्या असून पोलीसांना किरकोळ त्रास जाणवल्यानंतर त्यांनी तातडीने वैद्यकीय उपचार केल्यास पुढील आरोग्यविषयक गुंतागुंत टाळता येवू शकते असे त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमाच्या वेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. डॉ. श्री बी. जी. शेखर पाटील, नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे. नंदुरबार उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे, अक्कलकुवा उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संभाजी सावंत, शहादा उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. श्रीकांत घुमरे, पोलीस उप अधीक्षक श्री. विश्वास वळवी, पोलीस कल्याण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुनिल नंदवाळकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, जिल्ह्याचे विविध पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी व अमलदार उपस्थित होते.