1500 हेक्टरवर पीक नुकसान; मंत्री द्वयांसह खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

नंदुरबार – जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. सुमारे 1500 हेक्टरवर पीक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने सरकारला दिला आहे. दरम्यान,  पालकमंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित,  खासदार डॉ. हिना गावित यांनी अधिकाऱ्यांसमवेत तातडीने पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला.
 तसेच  नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील साक्री, टिटाणे भागात गारपीटीने झालेल्या नुकसानीची पाहणी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या समवेत केली व अधिकार्‍यांना तातडीने पंचनामे करून मदत मिळवून देण्याची सूचना केली. नंदुरबार तालुक्यातील कढरे, आसाने , वैंदाणे परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी पालकमंत्री डॉ. गावित यांनी केली, त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी आश्वस्त केले.
पुन्हा अवकाळीचा ईशारा 
उत्तर महाराष्ट्रासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने जिल्हयात बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने पालकमंत्र्यांनी  प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत. भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या हवाल्याने नंदुरबार तालुक्यातील कोळदा येथील डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित कृषि विज्ञान केंद्राने हवामान अंदाज वर्तवताना म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र दि. १२ मार्चपर्यंत हवामान कोरडे राहील. त्यानंतर १३, १४ आणि १५ मार्च रोजी हवामान ढगाळ राहील तर तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. किमान तापमान १६ ते १८ व कमाल तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअस  राहील. हलक्या पावसाची शक्यता असल्याने हरभरा, गहु, इत्यादी पक्वता अवस्थेत असलेल्या पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावीत.
शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे . यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व पंचनामे करावेत असेही निर्देश पालकमंत्री डॉ. गावित यांनी  दिले आहेत. जिल्ह्यातील कढेरे, आसाने, वैंदाने सह जिल्ह्यातल्या  महत्त्वाच्या क्षेत्रात अवकाळी पाऊस झाला. अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.
नुकसान पाहणी प्रसंगी नंदूरबारचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात ,नंदुरबार तालुका कृषी अधिकारी स्वप्निल शेळके, कृषी पर्यवेक्षक सुधीर पाटील ,कृषी सहाय्यक सर्वश्री सतीश गिरासे कंडरे ,बादल बंजारा, गजानन पाटील, सुवर्ण अहिरे तसेच महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!