नंदुरबार – अचानक दगडफेक करीत एक जमाव चालून आल्यामुळे नंदुरबार शहरातील मध्यवर्ती भागात प्रचंड तणाव निर्माण झाला. दोन पोलीस कर्मचारी आणि काही तरुण या दगडफेकीत जखमी झाले आहेत तथापि वेळीच पोलीस ताफा धावून आल्यामुळे सर्व स्थिती नियंत्रणात आली. आतापर्यंत 28 जणांना अटक करण्यात आली आहे.
रमजान महिना चालू असल्याने धार्मिक वातावरण संवेदनशील आहे त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा, हनुमान जयंती, आंबेडकर जयंती पाठोपाठ 22 एप्रिल रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीत महाशिव कथा आयोजित करण्यात आलेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर घडलेली दंगल शहरवासीयांना विचलित करणारी आहे. तथापि स्थिती नियंत्रणात आल्याचा दावा जिल्हा पोलिसांकडून करण्यात आला असून तातडीने शांतता समितीची बैठक देखील घेण्यात आली.
याविषयी अधिक वृत्त असे की, मंगळवार दिनांक 4 मार्च 2023 रोजी रात्री 11:30 नंतर नंदुरबार शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात मोठ्या संख्येने एक जमाव अचानक चालून आला. तुफान दगडफेक या जमावाकडून चालू झाल्यामुळे झोपेत असलेले नागरिक हादरले. दगडफेक करीत चालून आलेल्या पैकी काही जणांनी वाहनांची तोडफोड करीत जाळण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार थांबविण्यासाठी दुसरा जमाव रस्त्यावर उतरला आणि त्यांनीही दगडफेक सुरू केली. यात मोठ्या प्रमाणावर विटांचा व काचेच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला. खच पडेल, इतक्या प्रमाणात दगड बाटल्या अवघ्या काही मिनिटात दंगलखोरांना कसे काय उपलब्ध होतात? हा प्रश्न या घटनेप्रसंगी देखील उपस्थित झाला.
घटना समजताच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील, उपअधीक्षक सचिन हिरे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक किरण खेडकर, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर आणि इतर अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दगडाचा वर्षाव होत असतानाही ते धाडसाने जमाव नियंत्रित करीत पुढे घुसले. यात निरीक्षक किरण खेडकर, निरीक्षक रवींद्र कळमकर आणि अन्य दोन कर्मचारी यांना दगडांचा मार बसला. पहाटे तीन वाजेपर्यंत सर्वत्र शांतता प्रस्थापित करण्यात पोलीस दलाला यश आले. लगेचच अटक सत्र सुरू करून गुन्हे दाखल करण्यात आले. आज बुधवार रोजी देखील अटक सत्र सुरूच आहे. धुडगूस घालत दहशत मालजवल्या प्रकरणी पोलीसांनी 28 जणांना आतापर्यंत अटक केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील अप्पर अधीक्षक तांबे, गृह उपाधीक्षक सचिन हिरे उपअधीक्षक विश्वास वळवी हे जातीने लक्ष ठेवून आहेत. दरम्यान नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी या वरिष्ठांच्या उपस्थितीतशहर पोलीस ठाण्यात तातडीने शांतता कमिटीची बैठक घेतली. शांतता प्रस्थापित करणे विषयी या बैठकीत आवाहन करण्यात आले. आज सकाळपासूनच या भागातील सर्व परिस्थीती नियंत्रणात असून पोलीसांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये व शहराची शांतता भंग होऊ नये, या दृष्टीने पोलिसांनी फौजफाटा तैनात केला आहे.
दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे तसेच जातीय तेढ निर्माण होईल अशा अफवा पसरवू नये असे आवाहन केले आहे. जमावाच्या स्वरूपात येऊन काही जणांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला दगडफेक केली परंतु पोलीस दलाने वेळेवर येऊन सर्व स्थिती नियंत्रित केली आता त्या भागात शांतता आहे व शहरातील व्यवहारही सुरळीत आहेत. शांतता भंग करणाऱ्या जमावातील काही तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक पी आर पाटील यांनी दिली.