घरमालकाकडे घरफोडी करून भाडेकरूनेच रचला बनाव; अवघ्या 8 तासात गुन्हा उघड; पोलिसांची कामगिरी

नंदुरबार –  घर फोडी करून सुमारे आठ लाख रुपयाहून अधिक रकमेचा ऐवज चोरांनी लंपास केल्याची घटना आज पहाटे घडली. तथापि घरमालकाकडे घरफोडी करून भाडेकरूनेच बनाव रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आणि अवघ्या आठ तासात पोलिसांना चोरीचा उलगडा करण्यात यश आले.
शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या मार्गदर्शनात कौशल्यपूर्वक  तपास व अनुभवाची सांगड घालून घरफोडी सारखा मालमत्तेविरुध्दचा गंभीर गुन्हा अवघ्या काही तासात उघड करुन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकास नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी रोख बक्षिस जाहीर केले.
या घटनेविषयी पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक 02/05/2023 ते दिनांक 04/05/2023 रोजीचे पहाटे दरम्यान श्री. शेख युसुफ शेख चांद वय- 53 वर्षे रा. प्लॉट नंबर-115 पटेलवाडी, नंदुरबार यांचे राहते घराचा तोडून अज्ञात आरोपीताने घरातील कपाटामधून 8 लाख 97 हजार 250 रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याचा गुन्हा नंदुरबार शहर पोलीस ठाणे आज दि. 4/05/2023 रोजी 11.44 वा. नोंदविण्यात आला होता. नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे यांचेसह इतर पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली त्याचवेळी श्री. शेख युसुफ शेख चांद यांचे घरात घर भाडेकरु म्हणून 3 वर्षापासून राहत असलेले जुबेर इब्राहिम शहा याने देखील त्यांच्या राहत्या घरात चोरी झालेबाबत सांगितल्याने पोलीस यंत्रण सतर्क झाली. नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी घटनेचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांना तात्काळ गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करणेबाबत आदेशीत केले.
श्री. जुबेर शहा यांचे घरात झालेल्या घरफोडीच्या घटनास्थळाची नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील पाहणी करीत असतांना जुबेर शहा हा त्याचे घरात चोरी झालेबाबत बनाव करीत असल्याचा संशय आला. म्हणून पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पथक तयार करुन श्री. जुबेर शहा यास सखोल विचारपूस करणेबाबत आदेशीत केले. या पथकाने हिसका दाखवताच त्याने चोरी केलेला 8 लाख 97 हजार 250 रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम मुद्देमाल देखील त्याच्याच घरातून काढून दिला. सदर मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त करण्यात आला.
सदर कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक श्री. सागर आहेर, पोलीस नाईक राकेश मोरे, भटु धनगर, पोलीस अंमलदार अभय राजपुत, योगेश जाधव यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!