नंदुरबार – शहादा तालुक्यातील सामुद्रे परिवार दशक्रिया विधीसाठी तापी काठावर गेला असतांना त्यांचा मोठा मुलगा तोल जाऊन प्रवाहात पडला. तेव्हा त्याला वाचविण्यासाठी लहान भावाने उडी घेताच तोही वाहून गेला. त्याचा शोध मंगळवारीी रात्री उशिराापर्यंत चालू होता.
अधिक वृत्त असे की, शहादा तालुक्यातील एक परिवार दशक्रिया विधीसाठी प्रकाशा येथील तापी नदीकाठच्या स्मशानभूमीत आला होता. त्या परिवारातील रवींद्र समुद्रे यांचा मोठा मुलगा गौतम याचा अचानक तोल गेला आणि तापीच्या पुरात वाहू लागला. ते पाहून त्याचा लहान भाऊ राज याने ताबडतोब तापी नदीत उडी घेत मोठ्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रवाह वेगात असल्यामुळे तो पुढे वाहून गेला. दरम्यान, काठावरील मासेमारी करणारे तत्पर धावून आले आणि त्यांनी उड्या घेत दोघांचाही शोध घेतला. बऱ्याच अंतरावर गौतम याला वाचवण्यात त्यांना यश आले. परंतु राज आढळला नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांचे व नागरिकांचे पथक त्याचा शोध घेत आहेत. एका भावाला वाचवताना दुसऱ्या भावाचा जीव धोक्यात आला म्हणून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.