नंदुरबार – जिल्ह्यातील वन हक्क दाव्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार डॉ.हिनाताई गावित यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यातून एकूण दाखल झालेले दावे व आत्तापर्यंत मंजूर झालेले दावे पाहता सुमारे 20 हजार दाव्यांचा निकाल लागणे शिल्लक असल्याचे निदर्शनास आले. वनदाव्यांची अशी सर्व प्रकरणे सोडविण्यासाठी ऐरणीवर घेऊन खासदार डॉक्टर हिना गावित यांनी गती दिली आहे.
अनेकांचे दावे सापडत नाहीत अशी तक्रार असून जिल्ह्यातील सर्व वनसमितीद्वारे किती दावे दाखल झालेले आहेत, याचा आढावा घेऊन शहानिशा करण्याचे निर्देश देण्यात आले. ज्यांचे दावे सापडत नाहीत त्यांना नवीन संधी देण्याचेही ठरवण्यात आले. वर्षभरात हा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी प्रशासनाने कंबर कसावी, यासाठी सर्व ते सहकार्य करण्याची तयारी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी दाखवली.
याशिवाय ज्यांच्या दिलेल्या वन पट्ट्यांवर च:तुसीमा दाखवलेल्या नाही, प्रत्यक्ष खेडत असलेल्या क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची नोंद आहे, ज्यांनी एकापेक्षा अधिक ठिकाणी अतिक्रमण केले आहे व त्याचे अतिक्रमीत क्षेत्र एकूण चार हेक्टर पेक्षा कमी आहे तशा दाव्यांना त्वरित निकाली काढण्याच्या सूचना करण्यात आल्या. ॲग्रीसिल्व्हीप्लॉट ,फायरलाईन प्लॉट, पिलर लाईन प्लॉट या जमिनी सरकारने वेठबिगार म्हणून दिल्या होत्या, त्या जमिनींना अतिक्रमीत जमिनी न मानता त्यांच्या नावावर कराव्यात, यासंदर्भातील पुरेशी माहिती घेऊन पुढील बैठकीत विस्ताराने चर्चा करावी, असे ठरले. तळोदा तालुक्यातील पुनर्वसन क्षेत्रातील सुमारे 800 अतिक्रमणधारकांना “तुमची जमीन महसूल झाली आहे सबब तुमचे दावे फेटाळण्यात येत आहेत”असे म्हणून जुन्या 1980 च्या आधीच्या वन क्षेत्रावरील अतिक्रमण धारकांना त्यांच्या हक्कापासून डावलले जात असल्याचा प्रश्न अनेक वर्षा पासून प्रलंबीत आहे. या संदर्भात डॉ.कांतीलाल टाटीया यांनी निवासी जिल्हाधिकारी खांदे यांना आमोनिचे भीका आट्या सह निवेदनाद्वारे वन हक्क कायद्यातील कलम 3 च्या 8 प्रमाणे सोडविण्याची मागणी केली. खा.हीना गावित व आ.डॉ.विजयकुमार गावित यांनीही हा प्रश्न तातडीने सोडवणे बाबत आग्रह धरला. वनदावे निकाली काढण्यासाठी जीपीएस मोजणी 2019 पासून बंद आहे. त्या जीपीएस मोजणीची वेबसाईट सुरू करणे बाबत आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे श्री डॉ.राजेंद्र भारुड यांचेशी संपर्क करणेबाबत ठरवण्यात आले. आजच्या आढावा बैठकीत आ.डॉ.विजयकुमार गावित, डॉ.कांतीलाल टाटीया, निवासी जिल्हाधिकारी खांदे, उपविभागीय अधिकारी डॉक्टर चेतन गिरासे, मिलन करणवालजी, मैनक घोष हे सुद्धा उपस्थित होते. यशवंत पाडवी, भिका पाडवी ,रामदास पावरा, नितेश वळवी ,शिवाजी पराडके, चंदू पाडवी, रोशन पाडवीसह अनेक अतिक्रमणधारक उपस्थित होते. आगामी काळात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ज्यांचे दावे अद्याप निकाली निघाले नाहीत असे व तालुक्यातील सर्व वन समित्यांच्या अध्यक्ष व सचिवांची बैठक घेण्यात येऊन हा प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले.