शहर पोलिसांची झटपट कारवाई! भुरट्या चोऱ्या करून नाकेदम आणणाऱ्या दोघांना केली अटक

नंदुरबार – शहरातील नेहा पार्क परिसरात आणि अन्य ठिकाणी लहान सहान चोऱ्या करीत काही भुरट्या चोरांनी उच्छाद मांडला होता. घराबाहेर ठेवलेल्या वस्तू तसेच सायकली पाण्याचे मोटर वाहनांच्या बॅटरीज अशा वस्तू चोरण्याचा त्यांनी सपाटा लावला होता. परंतु शहर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी शोध पथकाच्या माध्यमातून वेळीच चोरांच्या मुसक्या आवळून मुद्देमाल हस्तगत केला. राजीव फकीरा वळवी आणि रवि शंकर ठाकरे, दोन्ही रा. भोणे फाटा भिलाटी नंदुरबार असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.
दिनांक आठ व नऊ जून 2023 दरम्यान धुळे रोडवरील नेहा पार्क येथे भुरट्या चोरांनी अनेक ठिकाणी चोऱ्या केल्याचे या कारवाईमुळे उघडकीस आले. या कालावधीत नेहा पार्क येथील रहिवासी किशोर पवार यांच्याकडील सायकल राजू नाईक यांच्याकडे पाण्याची मोटर चोरी केली होती त्याचबरोबर नेहा पार्क येथील भुपेंद्र पुंडलिक मराठे यांच्या क्र. MH १५ Y ४०१६ रिक्षेतून 3०००/- रु.ची बँटरी चोरुन नेली होती. सोपान नथ्थु पाटील वय- २४ व्यवसाय- गॅरेज रा. कार्ली ता. जि. नंदुरबार मु. मधुबन कॉलनी धुळे रोड नंदुरबार  यांच्या मालकीची 4 हजार रुपये किमतीची बॅटरी तसेच टाटा मॅजिक चार चाकी वाहन क्र. MH- १८ BC – ८९३६ यातील बॅटरी गेली. नेहा पार्क येथील रहिवासी प्रकाश मराठे यांची ७०००/- रु. कि. कंपनीची सायकल दिनांक 9 जून 2023 च्या पहाटे चोरीस गेली. याच दरम्यान मोठा मारुती मंदिराजवळील लक्ष्मी परदेशी यांच्या घरासमोर लावलेल्या सात हजार रुपये किमतीची तसेच चार हजार रुपये किमतीचे दोन सायकली चोरांनी लांबवल्या होत्या.
दरम्यान,  शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पथक बनवून भुरट्या चोरांचा शोध घेतला. पोलीस नायक भटू धनगर नरेंद्र चौधरी योगेश लोंढे हे शोध घेत असताना त्यांना भोणे फाटा येथे एका पडक्या झोपडीजवळ दोन तरुणांच्या संशयास्पद हालचाली दिसल्या.  त्यावरून ताब्यात घेत त्यांनी कसून चौकशी केली तेव्हा वरील सर्व चोऱ्या उघड झाल्या. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि त्यांच्या शोध पथकाने या भुरट्या चोऱ्या करणाऱ्यांकडून बादल्या, पाण्याच्या टाक्या, पाण्याच्या मोटारी, सायकली, गाद्या असा जवळपास 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!