आदिवासी जनआक्रोश : मोर्चात एकवटल्या सर्व संघटना सर्व पक्ष; मणिपूर प्रकरणाचा केला तीव्र निषेध

नंदुरबार- मणिपूर येथील अत्याचाराच्या निषेधार्थ जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज नंदुरबार शहरातून काढण्यात आलेल्या आदिवासी जन आक्रोश मोर्चाला रेकॉर्ड ब्रेक उपस्थिती लावत आदिवासी बांधवांनी उपस्थिती दिली.
 तीव्र निषेध करणाऱ्या घोषणा, हजारो जणांच्या हातात झळकणारे निषेध फलक आणि महिला पुरुषांनी परिधान केलेले काळे पोशाख व दंडावर बांधलेल्या काळ्या फिती जन आक्रोश मोर्चाचे वैशिष्ट्य ठरले. आदिवासी एकता परिषद आणि आदिवासी महासंघ यांच्यासह सर्व आदिवासी संघटनांनी एकत्र येऊन आयोजित केलेल्या जन आक्रोश मोर्चात पक्षीय भूमिका बाजूला ठेवून काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजपा सह विविध पक्षातील लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी यासह कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यात माजी मंत्री आमदार के.सी.पाडवी, आमदार आमश्या पाडवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, ज्येष्ठ साहित्यिक वहारू सोनवणे, जि.प.च्या माजी अध्यक्षा रजनी नाईक, माजी आमदार प्रा.शरद पाटील, जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक, जि.पसदस्य मोहन शेवाळे, सी.के.पाडवी, नागेश पाडवी, मालती वळवी, जेलसिंग पावरा, दिलीप नाईक, डॉ.भरत वळवी, डॉ.राजेश वळवी, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवी वळवी, टायगर सेनेचे राष्ट्रीय सचिव अजय गावित,  शिवसेनेचे वीरेंद्र वाळवी यांच्यासह विविध आदिवासी संघटनांचे , वैचारिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते सहभागी झाले.
दरवर्षी जागतिक आदिवासी दिवस विविध कार्यक्रमांचे तसेच उपक्रमांचे आयोजन करून साजरा केला जातो.  परंतु आज दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी त्या सर्व कार्यक्रमांना आणि उपक्रमांना फाटा देऊन निषेध दिवस पाळण्यात आला. मणिपूर येथे आदिवासी महिलांवर अत्याचार करण्याची घडलेली घटना,  मध्य प्रदेशात आदिवासी तरुणाची विटंबना करण्याचा घडलेला प्रकार तसेच समान नागरी कायदा या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर निषेध नोंदविण्यासाठी जन आक्रोष मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातून तरुणांचे जत्थे आणि महिला पुरुषांचे समूह नंदुरबार येथे उपस्थित झाले होते. महाराणा प्रताप चौकातून जिल्हाधिकारी कचेरीवर हा मोर्चा नेण्यात आला. मोर्चात सहभागी झालेल्या लोकांमुळे शहरातील संपूर्ण रस्ते व्यापले होते. अनेक महिलांनी व पुरुषांनी काळे पोशाख परिधान केले होते तर काही जण दंडाला रिविन बांधून व काळे झेंडे फडकवून निषेध नोंदवताना दिसले.
पोलीस दलाने केली पाण्याची व्यवस्था
या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शेकडोच्या संख्येने पोलीस फौज शहरात जागोजागी तैनात होती. जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तांबे,  विभागीय उपअधीक्षक संजय महाजन, विभागीय उपाधिकारी विश्वास वाळवी,  गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक किरणकुमार खेडकर,  शहर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर,  प्रतापराव मोहिते यांच्यासह सर्व प्रमुख अधिकारी स्थितीवर लक्ष ठेवून होते. दरम्यान मोर्चाकरांसाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राणा प्रताप चौक तसेच नेहरू चौक येथे पिण्याच्या पाण्याने भरलेले जार ठेवून पिण्याच्या पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!