नंदुरबार – महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वेगवेगळ्या पथकांनी दिनांक 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर असे सलग तीन दिवसापासून रोज छापेमारी चालवल्यामुळे अवैध मद्य विक्रेते चक्रावून गेले आहेत. जिल्ह्यात परराज्यातील आणि विदेशी मद्यसाठयाच्या होत असलेल्या अवैध वाहतुकी विरोधात जोरदारपणे कारवाई सुरू असून सलग तिसरा छापा टाकून प्रकाशा येथे सुमारे 30 लाख रुपयांचा मद्य साठा पकडण्यात आला.
तळोदा, अक्कलकुवा पाठोपाठ प्रकाशा भागात पकडलेला साठा मिळून आतापर्यंत एकंदरीत पाऊण कोटीहून अधिक रुपयांच्या मुद्देमालाची जप्ती झाली आहे. अचानक नंदुरबार जिल्हा लक्ष बनवून उत्पादन शुल्क विभागाने इतक्या सलग पद्धतीने छापेमारी करण्याची नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासातील ही पहिली घटना आहे. मध्यप्रदेश आणि गुजरात सीमेवर वसलेला नंदुरबार जिल्हा अनेक वर्षांपासून अवैध मद्य वाहतुकीचे जणू केंद्र बनलेला आहे. असे असताना अद्याप पर्यंत अशा लगातार कारवाया झालेल्या नव्हत्या. मग नंदुरबारवर आताच एक्साईज डिपार्टमेंटची वक्री नजर होण्याचे कारण काय? हा प्रश्न चर्चेत आला आहे. या कारवाईला काही राजकीय रंग असावे का? या अंगाने देखील चर्चा घडवल्या जात आहेत.
आमलाड शिवारात पहिली कारवाई
दि. 05/12/2023 रोजी अंकलेश्वर ते बन्हाणपुर रस्त्यालगत आमलाड शिवार हॉटेल सद्भावना समोर पत्रीशेडमधे मद्य साठा ठेवण्यात आल्याची गुप्त बातमी पथकाला प्राप्त झाली होती. त्यानुसार छापा टाकण्यात आला. त्यावेळी दोन वाहनातून तसेच पत्राशेडमधून परराज्यातील विदेशी मद्य व बियरचे एकुण २३३ बॉक्ससह एकुण रू. 25 लाख 83 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कार्यवाहीत पी.जे. मेहता, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार, श्री.बी.एस. महाडीक, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क नंदुरबार, श्री पी.एस. पाटील दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (अ) विभाग नंदुरबार, सा.दु.निरी. श्री.एम. के. पवार, जवान सर्वश्री, राहुल डो साळवे, हितेश पी जेठे, भुषण चौधरी, मानसिंग पाडवी, हेमंत पाटील, धनराज पाटील, संदीप वाघ यांचा समावेश होता. सदर गुन्हयाचा तपास श्री.पी.जे. मेहता. दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार हे करीत आहेत.
नंतर डाब परिसरात छापा
अक्कलकुवा तालुक्यातील डाब परिसरात छापेमारी करून उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबईतील भरारी पथकाने सुमारे 20 लाख 44 हजाराचा मद्य साठा आणि वाहन जप्त केले. ही कारवाई करत असतानाच या पथकावर अचानक दगडफेक करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. दगडफेक केल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली. अधिक माहिती अशी, की डाब गावाच्या हद्दीत परराज्यातील अवैध मद्य साठा असल्याची गुप्त माहिती मुंबईतील भरारी पथकाला प्राप्त झाली होती त्यानुसार विजयकुमार सुर्यवंशी, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशानुसार सुनिल चव्हाण, सह-आयुक्त (प्रशासन), राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई च्या राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने दि. ०६/१२/२०२३ रोजी अक्कलकुवा-मोलगी रस्त्यावर डाब गावाच्या हद्दीत आश्रम शाळेजवळ पाळत ठेवून छापा टाकला. सदर जागेतून गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचे १८० बॉक्स व अशोक लेलैंड कंपनीचा चार चाकी टेम्पो क्र. MH-39-AD-1639 हे वाहन असा एकूण रु. २०,४४,४००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन वाहन चालक टिकाराम लक्ष्मण पावरा व त्याचा साथीदार (क्लीनर) जितेंद्र धनराज महाले यांना महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये अटक केली व गुन्ह्याची नोंद केली.
या कारवाई दरम्यान अमलीबारी जवळील घाट रस्त्यात या कारवाई करणाऱ्या पथकावर अचानक काही जणांनी दगडफेक केल्याची घटना घडली. याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाचे जवान शाहरुख तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दगडफेक करुन व सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या अनिल आपसिंग वसावे व वसंत शिफा वसावे यांना अक्कलकुवा पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यांच्या विरुध्द गुन्हा नोंद केला. सदरच्या कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक, श्री. एस. एन इंगळे, तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री. रविंद्र पाटील, जवान सर्वश्री शाहरुख तडवी, सोमनाथ पाटील, नंद महाजन यांनी भाग घेतला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री. आर. एम. खान व श्री. व्ही. के. थोरात, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक श्री. एस. एन. इंगळे हे करीत आहेत.
तिसरा छापा प्रकाशात; 30 लाखाचा मद्यसाठा जप्त
तळोदा तालुक्यात आमलाड आणि अक्कलकुवा तालुक्यातील डाब शिवारात कारवाई केल्याच्या पाठोपाठ दिनांक ०७/१२/२०२३ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभाग भरारी पथकाने देखील प्रकाशा अक्कलकुवा रस्त्या लगत, प्रकाशा शिवार, प्रकाशा ता. शहादा या ठिकाणी वाहनतपासणी सापळा रचून महाराष्ट्रात प्रतीबंधीत असलेले गोवा राज्यात निर्मीत विदेशी मद्य ३०० बॉक्स आणि महिंद्रा बोलेरो मॅक्स पीकअप असा ३० लाख ६७ हजार रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी सागर शांतीलाल सैंदाणे (वाहनचालक), वय २८ वर्षे, राहणार संत गाडगेनगर, बोराडी, ता. शिरपुर, जि.धुळे, कमलेश सुभाष पाटील, राहणार मु.पो. बोराडी ता. शिरपुर जि.धुळे (फरार) मद्य पुरवठा दार, विणा (पूर्ण नाव माहित नाही) (फरार) सदर वाहन क्र.MH.१८.BZ०८५१ चे मालक व संशयीत अज्ञात इसम यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई डॉ.श्री. बा.ह. तडवी, विभागीय उप-आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग, नाशिक तसेच मा. श्रीमती, स्नेहा सराफ, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नंदुरबार यांचे मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक श्री.ए.एस. चव्हाण, दुय्यम निरीक्षक श्री. ए.जी. सराफ, श्री.व्ही.बी.पाटील, जवान सर्वश्री भाऊसाहेब घुले, धनराज पवार, महेश सातपुते, यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सदरील गुन्हयाचा पुढील तपास श्री.व्ही. बी. पाटील, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, नाशिक विभाग, नाशिक हे करीत आहेत.