२०० हून अधिक हिंदू धर्मियांनी केला ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ स्थापन करण्याचा संकल्प !
रायपूर, (छत्तीसगड) – ज्याप्रमाणे जगभरातील ज्यूंनी स्वत:चे राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प केला, त्याचप्रमाणे त्यांनी इस्राइल राष्ट्र निर्माण केले. तसेच हिंदूही स्वत:चा संकल्प विसरत नाहीत. आज अयोध्येत राममंदिर साकार झाले आहे. आपला पुढील संकल्पही निश्चितपणे पूर्ण होणार आहे. त्यासाठी सातत्याने संघर्ष करावा लागणार आहे. या भूमीने छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य पाहिले आणि आगामी काळात रामराज्यही निर्माण होईल, *असे प्रतिपादन छत्तीसगड राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. विजय शर्मा यांनी केले.* ते छत्तीसगड राज्यातील रायपूर येथील पूज्य सदानी दरबार रायपूर येथे आयोजित ‘छत्तीसगड राज्यस्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त बोलत होते.
पूज्य सदानी दरबार तीर्थ, श्री नीळकंठ सेवा संस्थान, मिशन सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. पू. युधिष्ठिरलाल महाराज, पू. रामबालकदास महात्यागी, पंडित नीलकंठ त्रिपाठी महाराज, सनातन संस्थेचे पू. अशोक पात्रीकर आदी संतांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने हिंदू अधिवेशनाचा प्रारंभ झाला. प्रारंभी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. या संमेलनात ‘६९५’ चित्रपटांचे निर्माते श्री. श्याम चावला, भाजपचे ज्येष्ठ नेते सच्चिदानंद उपासनी, सीए असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्री. अमिताभ दुबे, शिवसेनेचे रायपूरचे श्री. आशिष परेडा यांच्यासह राज्यातील १२ हून अधिक जिल्ह्यांतील २५० हून अधिक धर्माभिमानी, विविध हिंदू संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते, आचार्य, महंत, वकील, प्राध्यापक आदी सहभागी झाले होते.
या वेळी *छत्तीसगड राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. विजय शर्मा पुढे म्हणाले की,* मिशनरी, नक्षलवादी, जिहादी, सेक्युलर आणि खलिस्तानी यांचे अभद्र युती हिंदु धर्म नष्ट करण्याचे काम करत आहे. हिंदू संघटना, संत, हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते आणि अधिवक्ता यांचे संघटन करून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे. सध्या वक्फ कायद्यानुसार हिंदूंच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केला जात आहे. मंदिरे ताब्यात घेतली जात आहेत. हा काळा कायदा हटवण्यासाठी प्रत्येक गावातील हिंदूंनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
*शदानी दरबारचे पू. युधिष्ठिरलाल महाराज म्हणाले की,* आपण एका महान प्राचीन संस्कृतीचे अनुयायी असूनही आपण आपल्या राष्ट्रात हिंदू धर्माचा झेंडा फडकवू शकलो नाही. परात्पर गुरु डॉ.आठवले आणि अन्य संतांच्या नेतृत्वाखाली चालवलेले हे अभियान नक्कीच यशस्वी होईल आणि भारत हिंदु राष्ट्र होईल. हिंदु जनजागृती समिती, सदानी दरबार तीर्थ, आपण धर्मग्रंथ, संत आणि दैवी शक्तींना अधिक महत्त्व देतो. यातून आपल्याला मिळणारी शक्ती ही शस्त्रापेक्षा अधिक महत्त्वाची आहे.
या अधिवेशनामध्ये संबोधित करताना *पाटेश्वर धामचे प पू रामबालकदास महाराज* यांनी सांगितले की राम मंदिरात रामल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे त्यामुळे संपूर्ण देश राममय झाला आहे ‘अब मथुरा काशी बाकी है’ धर्म विरोधी लोकांकडून अनेक ठिकाणी हिंदूधर्म संस्कृती आणि परंपरा यांवर आघात होत आहेत ते रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन प्रतिकार करण्याची आवश्यकता आहे.
*सनातन संस्थेचे धर्मप्रसारक पू. अशोक पात्रीकर म्हणाले की,* आज बांधलेले राममंदिर हिंदू राष्ट्राच्या स्थापनेचा पाया आहे; पण हिंदु राष्ट्र कोणतीही आपल्याला भेट म्हणून देणार नाही. त्यासाठी त्याग आणि संघर्ष करावा लागणार आहे. धार्मिक आचरण आणि साधना करून आध्यात्मिक बळ निर्माण करावे लागेल. या आध्यात्मिक बळावरच रामराज्यासारखे आदर्श हिंदु राष्ट्र निर्माण होईल.
अधिवेशनातील सत्रात ‘वक्फ बोर्डाचा लँड जिहाद’ या विषयावर श्री. सुनील घनवट, ‘मंदिरांचे संघटन आणि मंदिरे सनातन धर्माच्या प्रसाराची केंद्रे कशी होतील’ या विषयावर सीए मदनमोहन उपाध्याय, ‘राजसत्तेवर धर्मसत्तेची आवश्यकता’ या विषयावर पू. रामबालकदास महात्यागी महाराज, हिंदूसंघटनात संतांची भूमिका आरि संतांचे कार्य’ या विषयावर पंडित नीळकंठ त्रिपाठी, ‘हिंदूंचा बुद्धीभेद करणार्या नेरेटिव्हचा सामना कसा करावा’ या विषयावर श्री. संतोष तिवारी, ‘हिंदू संघटनांसाठी प्रसारमाध्यमांचे व्यवस्थापन कसे करावे’, या विषयावर श्री. अमित चिमनानी आदी मान्यवर वक्त्यांनी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांना संबोधित केले.
‘हिंदु धर्मावरील आघातांविरोधात कृतिशील प्रयत्न’ या विषयावर आयोजित परिसंवादात रणरागिणी श्रीमती ज्योती शर्मा, श्रीमती शर्मा, आचार्य शशिभूषण मोहंती, धर्मसेना अध्यक्ष श्री. विष्णू पटेल, गोरक्षक श्री. अंकित द्विवेदी आदींनी आपल्या अनुभवातून धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या आदी समस्यांवर हिंदुत्वनिष्ठांना दिशादर्शन केले.
या वेळी सर्वांनी संघटितरित्या प्रयत्न करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ स्थापन करून हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत संघटित प्रयत्न करण्याचा संकल्प केला. शेवटी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करून, तसेच कृतज्ञता व्यक्त करू हिंदु राष्ट्र अधिवेशनाची सांगता करण्यात आली.