दिल्लीतील शानदार सोहळ्यात खासदार डॉ. हिना गावित ‘महा संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित

नंदुरबार – आदिवासी दुर्गम भागाचे देशाच्या संसदेत प्रतिनिधित्व करताना बजावलेली कामगिरी आणि निभावलेले अभ्यासपूर्ण नेतृत्व याची दखल घेऊन आज दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी दिल्ली येथे नव्या महाराष्ट्र सदनात पार पडलेल्या भव्य सोहळ्यात देश स्तरावरचा मानाचा ‘महा संसदरत्न’ हा पुरस्कार प्रदान करून खासदार डॉक्टर हिना गावित यांना सन्मानित करण्यात आले.

विशेष उल्लेखनीय आहे की, याआधी सलग 7 वेळा डॉक्टर हिना गावित या संसद रत्न पुरस्काराने सन्मानित झाल्या असून हा एक विक्रम ठरला आहे. महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित देखील या सोहळ्याला उपस्थित होते.

17 व्या लोकसभेसाठी प्रतिष्ठित महासंसदरत्न पुरस्कार पाच वर्षातून एकदा घोषित केले जातात. यंदाही चार प्रतिष्ठित संसद सदस्य आणि संसदेच्या तीन स्थायी समित्यांना त्यांच्या सातत्यपूर्ण आणि अनुकरणीय कामगिरीबद्दल सन्मानित करण्यासाठी जाहीर करण्यात आले आहेत. चेन्नईस्थित एनजीओ प्राइम पॉइंट फाऊंडेशन आणि ई-मॅगझिन प्रेससेन्स द्वारे पाच वर्षातून एकदा दिला जाणारा ‘संसद महारत्न पुरस्कार’, संसदेतील उत्कृष्ट कामगिरीची एक अर्थाने कबुली देतो.

प्राइम पॉइंट फाऊंडेशनच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार हे पुरस्कार सर्वसमावेशक कामगिरीवर आधारित आहेत. अर्जुन राम मेघवाल, कायदा आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री आणि माजी टी. एस. कृष्णमूर्ती यांच्या अध्यक्षतेखालील प्रतिष्ठित ज्युरी समितीने या नामांकित व्यक्तींची निवड केली आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या संकेतस्थळांवरून तसेच PRS विधान संशोधनातून प्राप्त करण्यात आलेल्या कामगिरी डेटाचा त्यासाठी आधार घेतल्याचे सांगण्यात आले.

प्राइम पॉइंट फाउंडेशनच्या विश्वस्त सचिव आणि संसद रत्न पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्रियदर्शनी राहुल यांच्या नेतृत्वाखालील संसदरत्न पुरस्कार समितीने संपूर्ण 17 व्या लोकसभेसाठी संसद महारत्न पुरस्कार प्राप्तकर्त्यांची घोषणा केली. यामध्ये एन के प्रेमचंद्रन (आरएसपी, केरळ), अधीर रंजन चौधरी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, पश्चिम बंगाल), विद्युत बरन महतो (भाजप, झारखंड), आणि डॉ. हीना विजयकुमार गावित (भाजप, महाराष्ट्र) यांचा समावेश आहे.

खासदार डॉ.हिना यांची अशी आहे कामगिरी

नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉक्टर हिनाताई गावित या अतिदुर्गम भागाचे देश स्तरावर प्रतिनिधित्व करीत आहेत. हे प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी संसदेत बजावलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. लोकसभा अधिवेशना दरम्यान वेळोवेळी आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्यांवर, आदिवासी बेघरांना घरकुल मिळवून देण्याच्या प्रश्नावर, महुआ मोइत्रा यांच्या कथीत भ्रष्टाचारासारख्या प्रकरणांवर संसदेतील चर्चेत सहभागी होऊन आवाज उठवताना डॉक्टर हिनाताई गावित पाहायला मिळाल्या आहेत. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील विकास कामांना गती देण्याची त्यांची हातोटी आणि कार्यपद्धती तर सध्या कौतुकाचा विषय बनला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना, नंदुरबार रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, आरोग्य प्रश्नांची सोडवणूक करणारे उपाय योजना अशा अनेक ठळक विकास कामांचा दाखला देण्याबरोबरच नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्याला कोट्यवधी रुपयांच्या रस्ते कामासाठी त्यांनी मिळवून दिलेला निधी, जल जीवन मिशन योजनेतून अनेक दुर्लक्षित गावांना मिळवून दिलेल्या पाणी योजना, दुर्गम पहाडपट्टीतील गावांमध्ये केलेले विद्युतीकरण, पंतप्रधान आवास योजनेचा लाखो लाभार्थ्यांना दिलेला लाभ, केंद्रीय अर्थसहाय्य योजनेतून महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी दिलेली चालना त्याचबरोबर उज्वला गॅस योजना आणि तत्सम योजनांचे पाड्या-पाड्यात पोहोचवलेले लाभ; यांचेही दाखले त्यासाठी दिले जात आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांना जाहीर झालेला महा संसद रत्न पुरस्कार त्यांच्या कर्तुत्वावर शिक्कामोर्तब करणारा मानला जात आहे. संसद महारत्न पुरस्कार यापूर्वी संसदीय समित्यांना प्रदान केले जात नव्हते. परंतु सध्याच्या 17 व्या लोकसभेपासून तीन स्थायी समित्यांचा समावेश संसद महारत्न पुरस्कारांमध्ये करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!