नंदुरबार – ऐतिहासिक म्हणावे इतक्या संख्येने आलेल्या आदिवासी ग्रामस्थांच्या उपस्थितीत भव्य प्रचार मिरवणूक काढून आज दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी या गावात भारतीय जनता पार्टीने जणू हुंकार भरला. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी लढाई रंगात आलेली असताना थेट काँग्रेस नेते माजी मंत्री के सी पाडवी यांच्याच विधानसभा क्षेत्रातून आज अलोट असा जनसागर महायुतीच्या उमेदवार डॉ.हिना गावित यांच्या समर्थनार्थ मोलगीत उतरलेला दिसला. राजकीय दृष्टिकोनातून याला महत्त्व दिले जात आहे.
आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित, माजी मंत्री पद्माकर वळवी, विधान परिषद सदस्य आमशा पाडवी, आणि महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या नेतृत्वात पार पडलेली ही भव्य मिरवणूक आणि भव्य प्रचार सभा आदिवासी भागातील निवडणूक वातावरणाला उंचीवर नेणारी ठरली. अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी या अतिदुर्गम भागाने वेढलेल्या गावात आज दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी भारतीय जनता पार्टीच्या तथा महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या प्रचारासाठी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. अक्कलकुवा विधानसभा क्षेत्रातील दुर्गम गाव पाड्यातून शेकडोच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित राहिले आणि सहभागी झाले. पारंपारिक आदिवासी नृत्य करीत मिरवणुकीच्या अग्रभागी चालणाऱ्या पथकांनी लक्ष वेधले. ढोल वाजवणाऱ्या पथकांनी सुद्धा या मिरवणुकीत विशेष छाप पडली. संपूर्ण मोलगी परिसर मिरवणुकीसाठी आलेल्या लोकांनी फुलून गेलेला दिसला. मिरवणुकीच्या समाप्तीनंतर झालेल्या जाहीर सभेप्रसंगी रणरणत्या उन्हातही शेकडोच्या संख्येने आदिवासी ग्रामस्थ उपस्थित राहिले.
आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित, माजी मंत्री पद्माकर वळवी, विधान परिषद सदस्य आमशा पाडवी, आणि महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या मिरवणुकीला आणि प्रचार सभेला शिवसेनेच्या महिला संघटन प्रमुख प्रणिती पोंक्षे, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य नागेश पाडवी, भाजपाचे तालुका अध्यक्ष मितेश वळवी, जिल्हा परिषद सदस्य प्रताप वळवी, रुपसिंग पाडवी, सिताराम पावरा आणि अन्य स्थानिक मान्यवर उपस्थित होते.