‘त्या’ गरोदर हरिणीचा अखेर पिंजऱ्यातच मृत्यू; वनविभागाच्या ताब्यात असताना घडल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित

नंदुरबार – सिंध गव्हाण वनपरिक्षेत्रातून ताब्यात घेण्यात आलेल्या हरीणीने आज दिनांक 26 जून 2024 रोजी अखेर पोटातल्या पिलासह पिंजऱ्यातच जीव सोडला. वनविभागाच्या ताब्यात असताना हरणाचे योग्य संगोपन का झाले नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

नंदुरबार वनपरिक्षेत्रात हरणांसारखे सुंदर वन्यजीव देखील अस्तित्वात आहेत, याचा सुखद धक्का चार दिवसापूर्वी अनुभवणाऱ्या वन्यजीवप्रेमींच्या मनाला आज मात्र या मृत्यूने चटका बसला.

चार दिवसापूर्वी नंदुरबार तालुक्यातील सिंदगव्हाण वनपरिक्षेत्र हद्दीत हरिणी आढळली होती. स्थानिक ग्रामस्थांनी नंदुरबारचे वनक्षेत्रपाल वर्षा चव्हाण चव्हाण यांच्याशी संपर्क करून याची माहिती दिली होती. त्यानुसार त्यांनी काही सहकाऱ्यांची मदत घेऊन त्या हरणाला ताब्यात घेतले आणि नंदुरबार वनक्षेत्रपाल कार्यालयाच्या आवारात त्याला एका पिंजऱ्यात ठेवण्यात आले. भटक्या कुत्र्यांनी जखमी केले असल्यामुळे त्याला वनक्षेत्रात सोडता आले नाही आणि म्हणून त्याच्यावर पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार करण्यात येत आहे; असे त्या प्रसंगी सांगण्यात आले होते. त्यानुसार त्याची काळजी घेतली जात होती. तथापि आज दिनांक 26 जून 2024 रोजी त्या हरणाने पिंजऱ्यातच जीव सोडला. नाजूक सुंदर दिसणारी ती मादा हरीण लवकर बरी व्हावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या नंदुरबार वनक्षेत्रपाल कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना तिचा जिव्हाळा लागला होता. तथापि आज ती गतप्राण झालेली पाहून त्यांच्यासह वन्यजीव प्रेमी हळहळले.

दरम्यान, काही वन्य जीव प्रेमींनी यावर संतप्त भावना व्यक्त केल्या. ते हरिण खरोखर जखमी होते का याविषयी साशंकता वाटते, तसे असेल तर पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये उल्लेख आला पाहिजे, असे नमूद करून काही जणांनी सांगितले की, ती हरिणी गरोदर होती. तज्ञ अनुभवी लोकांकडून तिचे रेस्क्यू न केल्यामुळे चुका घडल्या तसेच लोकांपासून तिला दूर ठेवण्यात आले नाही म्हणून तिचा जीव गेला असावा; अशी शंका व्यक्त केली.

याविषयी वनक्षेत्रपाल वर्षा चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे जखमी अवस्थेतच ती सापडली होती. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तिच्यावर उपचार केले जात होते. मात्र आज ती अचानक दगावली याचे दुःख वाटते.

उपवनसंरक्षक धनंजय पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ती हरणी रेस्क्यू केली गेली त्या प्रसंगीच जखमी होती. तिच्यावर उपचार चालू होते. परंतु ती गरोदर देखील होती. तिच्या पोटातील पिल्लू दोन दिवस आधीच पोटातच मरण पावले होते, ही बाब तिच्या मृत्यूनंतर आज उघड झाली आहे. कदाचित त्यामुळेच ती आज दगावली असावी; असा आमचा कयास आहे, असे सांगून पवार यांनी अधिक माहिती देताना सांगितले की तिच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!