नंदुरबार : जलजीवन मिशन योजनेच्या सुमारे 3 हजार 995 कामांचे आराखडे मुळात आज धरणे आंदोलन करणाऱ्या विरोधकांच्या सत्ता काळात मंजूर झालेले होते आणि तेही चुकीच्या पद्धतीने केलेले होते. आमच्या सत्ता काळात फक्त 185 आराखडे मंजूर झाले असून त्यांच्या कामांमधील घोटाळे आम्हीच दुरुस्त करीत आलो आहोत. त्यामुळे सर्वपक्षीय विरोधकांनी त्या कामांची चौकशी व्हावी, अशी ओरड करणे म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आहेत; अशा शब्दात भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना प्रतिउत्तर दिले.
ज्या ठेकेदाराने जलजीवन मिशन योजनेच्या कामांचे घोटाळे केले त्यालाच व्यासपीठावर घेऊन काँग्रेसचे खासदार गोवाल पाडवी आणि इतर नेते पत्रकार परिषद घेतात आणि आमच्या चौकशीची मागणी करतात, हा कुठला न्याय आहे? असाही प्रश्न डॉक्टर हिना गावित यांच्याकडून उपस्थित करण्यात आला.
जिल्हा परिषदेतील प्रशासकीय कामांमधील अनियमिततेची तसेच जिल्हाभरात चालू असलेल्या जलजीवन मिशन कामांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, यासाठी महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांचे नंदुरबार जिल्ह्यातील सर्वपक्षीय विरोधक पुन्हा एकवटले असून आज दिनांक 16 जुलै 2024 पासून नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर त्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार गोवाल पाडवी, काँग्रेस पक्षाचे माजी कार्याध्यक्ष दिलीप नाईक, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार उदेसिंग पाडवी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे, शहादा बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील, शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अॅड. राम रघुवंशी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल, किरण तडवी हे आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत.
विरोधकांकडून पुन्हा फेक नॅरेटिव्हचा प्रयोग
या धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर थेट मुंबईतून डॉक्टर हिना गावित आणि जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी ऑनलाइन प्रेस कॉन्फरन्स घेऊन प्रत्युत्तर दिले. पत्रकारांना योजनांविषयी अधिक माहिती देत डॉक्टर हिना गावित म्हणाल्या, ‘गावित परिवाराला विरोध’ ही बॉटम लाईन आणि आगामी निवडणुका नजरे समोर ठेवूनच सर्व विरोधी पक्षीय नेत्यांनी नंदुरबार जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. लोकसभा निवडणुकीत फेक नरेटीव चा प्रयोग यशस्वी ठरला म्हणून विरोधकांनी पुन्हा पुढील निवडणुका नजरेसमोर ठेवून तसलाच प्रयोग सुरू केला आहे. तथापि केंद्र सरकारला विनंती करून नंदुरबार जिल्हा परिषदेअंतर्गत जल जीवन मिशन योजना लागू करण्याचे काम मी 2019 यावर्षी केले तेव्हा नंदुरबार जिल्हा परिषदेत आज धरणे आंदोलन करणाऱ्या काँग्रेस पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाच्या नेत्यांची सत्ता होती. काँग्रेसच्या एडवोकेट सीमा वळवी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होत्या आणि के सी पाडवी हे त्याकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री होते. अत्यंत चुकीच्या पद्धतीने सर्वे करून आणि नियमांचे उल्लंघन करून याच लोकांनी सुमारे 3995 जलजीवन कामांचे आराखडे बनवले होते. भाजपाच्या डॉक्टर सुप्रिया गावित ऑक्टोबर 2022 यावर्षी जिल्हा परिषद अध्यक्ष बनल्यावर म्हणजे आमच्या सत्ताकाळात त्यांनी केलेल्या चुकांची दुरुस्ती करण्यात आली आणि प्रत्येक गावाला सरपंच उपसरपंच यांना विश्वासात घेऊन पाणी पुरवण्याचे काम करण्यात आले.
योजना ठप्प करणारा ठेकेदार यांच्या व्यासपीठावर कसा?
विरोधकांच्या भूमिकेवर घणाघात करताना डॉक्टर हिना गावित यांनी आरोप केला की, चौकशीची मागणी करताना पत्रकार परिषदेतील व्यासपीठावर आणि धरणे आंदोलनाच्या ठिकाणी या सर्व विरोधकांच्या सोबत किरण तडवी हे सुद्धा बसलेले असतात. आज ज्या कामांविषयी विरोधक ओरड करत आहेत ती जलजीवनची कामे याच किरण तडवींच्या ड्रीम कन्स्ट्रक्शन च्या माध्यमातून केली गेली. के सी पाडवी हे पालकमंत्री असताना त्यांनी याविषयीच्या तक्रारींची कधीही दखल घेतली नाही. हे वास्तव असताना त्या चुकीच्या कामांसाठी आम्हाला जबाबदार धरून हे काँग्रेस आणि शिवसेना वाले आमच्या चौकशीची मागणी कशी काय करतात? असा प्रश्न डॉक्टर हिना गावित आणि डॉक्टर सुप्रिया गावित यांनी उपस्थित केला आहे.