‘डुप्लिकेट टीसी’ ला पकडले; संशयित नंदुरबारचा रहिवासी

नंदुरबार – तिकीट तपासनीस असल्याचे भासवून प्रवाशांकडे रेल्वे तिकिटांची तपासणी करणाऱ्या एकाला वलसाड रेल्वे स्थानकावर पकडण्यात आले असून तोतयेगिरी करीत असल्याच्या आरोपाखाली रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पकडण्यात आलेला हा तोतया तिकीट तपासनीस नंदुरबार तालुक्यातील दुधाळे ग्रामपंचायत शिवारातील असल्याचे तपासात आढळून आले.

याविषयी प्राप्त झालेली माहिती अशी की, वलसाड रेल्वे स्थानकातील फुट ओव्हर ब्रिजवर एक व्यक्ती तिकीट तपासनीस असल्याचे भासवून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांकडे तपासणीसाठी तिकीट मागत असताना काही प्रवाशांना संशय आला. त्यातील काही प्रवाशांनी तिकीट परीक्षक ए पी पांडे यांना त्या विषयी माहिती दिली. त्यांनी लगेचच रेल्वे सुरक्षा गार्डच्या मदतीने ब्रिजवर जाऊन पाहणी केली. त्यावेळी तिकीट तपासणी करणारा तो संशयित तोतया तपासणीस (डुप्लिकेट टीसी) असल्याचे लक्षात येताच झडप घालून त्याला पकडण्यात आले. चौकशी केली असता त्याला कोणतेही उत्तर देता आले नाही. सदर संशयित व्यक्तीकडे नंदुरबार तालुक्यातील दुधळे ग्रामपंचायत च्या ग्राम रक्षक दलाचे ओळखपत्र आढळून आले असून त्याचे नाव समाधान सामुद्रे असे सांगण्यात आले आहे. दरम्यान तिकीट परीक्षक पांडे यांनी रेल्वे पोलिसांना लेखी तक्रार देऊन या संशयताला रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. गुन्हा नोंद करून पुढील तपास करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!