उप निरीक्षकाच्या घरातून चक्क अवैध दारू साठा, 9 एम. एम. पिस्टलच्या दहा रिकाम्या पुंगळया यांसह लाखोचा मुद्देमाल जप्त

जळगाव – लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या मोठ्या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उप निरीक्षकाच्या घरातून चक्क अवैध दारू साठा, 9 एम. एम. पिस्टलच्या दहा रिकाम्या पुंगळया यांसह सुमारे 40 लाख 98 हजार 44 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामुळे खळबळ उडाली असून संबंधित अधिकारी या फरार उपनिरीक्षकाचा शोध घेत आहेत.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीत या प्रकरणी म्हटले आहे की, भुसावळ येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उप निरीक्षक राजकिरण सोनवणे आणि किरण माधव सुर्यवंशी, वय ३७ वर्ष, रा. नवीन हुडको, भुसावळ यांच्या विरोधात जळगाव जिल्ह्यातील फैजपुर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ (अ), १२ प्रमाणे दि.२३ नोव्हेंबर २०२४ रोजी एक गुन्हा दाखल करण्यात आला असून उप निरीक्षक राजकिरण सोनवणे हे तेव्हापासून फरार होते. राहते घरी भुसावळ येथे मिळुन न आल्याने त्यांचे राहते घर सिलबद करण्यात आले होते. दरम्यान विशेष न्यायालय, भुसावळ यांच्याकडून राहते घराची घर झडती घेणेकरिता सर्च वॉरंट घेण्यात आले. त्याप्रमाणे आज दि.२९.११.२०२४ रोजी सकाळी ०७.३० वाजेपासून दोन पंच, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व व्हिडीओ ग्राफर कॅमेरासह, फरार आलोसे क.१ राजकिरण सोनवणे हे भाडेतत्वावर राहत असलेल्या घराचे मुळ घर मालक यांचे उपस्थितीत त्यांची घर झडती घेण्यात आली. नाशिक परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस अधिक्षक श्रीमती शर्मिष्ठा घागरे वालावलकर,  जळगाव येथील उपाधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या पथकाने झडती घेण्याची कारवाई केली.
याप्रकरणी उप अधीक्षक योगेश ठाकूर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, घराची झडती घेतली असता १ लाख ४९ हजार २९० रुपये किमतीच्या २१४४ देशी विदेशी दारुच्या विविध ब्रॅण्डच्या बाटल्या, २,५००/- रुपये किमतीची दोन प्लॅस्टीकच्या कॅन मध्ये २५ लिटर गावठी हातभटटीची दारु, २ लाख १५ हजार २५४/- रुपये किमतीची बुलेट मोटर सायकल, १४ लाख रुपये किमतीची किया सेलटॉस कारचे पेपर्स, १ लाख ५० हजार रुपये किमतीचे ३ तोळे सोन्या चांदीचे दागीने, ९ एम. एम. पिस्टलच्या दहा रिकाम्या पुंगळया, १ लाख ९१ हजार रुपये रोख रक्कम, १७ लाख ९० हजार रुपये किमतीच्या सोने चांदी खरेदी केल्याच्या मुळ पावत्या, २ लाख रुपयांचे टी.व्ही. फिज, ए.सी. इतर वस्तु तसेच बँकेचे व ईतर कागदपत्रे असा एकंदरीत 40 लाख 98 हजार 44 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फरार राजकिरण सोनवणे यांचे राहते घरी वर प्रमाणे मिळुन आलेल्या देशी/ विदेशी/हातभटटी दारुच्या अवैध मद्यसाठा बाबत पुढील कारवाई करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!