धक्कादायक ! रूपे कार्डचा गैरवापर करीत मध्यवर्ती बँकेला लावला चुना; पीक कर्जाच्या माध्यमातून सुमारे 2 कोटीचा भ्रष्टाचार

नंदुरबार – विविध कार्यकारी सोसायटीच्या ८९ सभासदांच्या नावाने तयार केलेल्या खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे पीक कर्ज मंजूर करुन घेत जवळपास 2 कोटी रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पीक कर्ज परस्पर मंजूर करून घेण्याचा अजब फंडा अपहार कर्त्यांनी वापरलाच शिवाय बनावट तयार केलेल्या रुपे के. सी. सी. कार्डचा सुद्धा बिनधास्त आणि सर्रास वापर केल्याचे या प्रकरणात आढळून आले आहे.

हा सर्व अपहार 2009 ते 2022 या कालावधीत झाला आहे. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तळोदा शाखेत साखळी पद्धतीने घडवल्या गेलेल्या या अपहर प्रकरणी कागदी पुरावे समोर आल्यानंतर बँकेच्या संचालक मंडळाच्या विशेष बैठकीत यावर निर्णय करण्यात आला तसेच ठराव संमत करून कारवाईचे आदेश देण्यात आले. बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे आणि व्यवस्थापकीय संचालक धिरज चौधरी यांच्या आदेशान्वये बँकेचे विभागीय अधिकारी अनंत मदन ठाकुर शिरपुर विभाग (तत्कालिन विभागीय अधिकारी तळोदा विभाग) रा.प्लॉट क्र. ३/ए भावसार कॉलनी,जमानिगरी रोड, धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान अपहाराचा आरोप असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी काही प्रमाणात अपहरित रक्कम जमा केली तथापि एक कोटी पन्नास लाखाहून अधिक रक्कम जमा होणे बाकी असल्याची माहिती देण्यात आली आहे.

याविषयी पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, बँकेच्या तळोदा शाखेतील तत्कालीन शाखाधिकारी, तपासणीस आणि अन्य कर्मचाऱ्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करुन संगनमत करुन, नियोजनबध्द कट रचुन तळोदा शाखेशी संलग्न असलेल्या विविध कार्यकारी सोसायटीच्या ८९ सभासदांच्या नावाने खोटे व बनावट कागदपत्रे तयार केले. त्या कागदपत्रांवर त्यांची खोटी व बनावट सही करुन त्यांच्या नावावर पीक कर्ज मंजुर करुन घेतले. एवढेच नाही तर रुपे के. सी. सी. कार्ड वाटप रजिष्टवर त्यांची खोटी सही करुन त्यांच्या नावावर असलेले कार्ड स्वतःकडे ठेवून घेतले. त्या कार्डाच्या आधारे ATM/Micro ATM द्वारे कर्ज खात्यावरुन कर्जाची रक्कम वेळोवेळी काढून घेतली.

अशा पद्धतीने एकुण ८९ सभासदांकडील कर्ज रक्कम १,९१,५२०९०/- रु. मात्रचा रकमेचा अपहार केला. त्यात २ सभासंदांनी त्यांचेकडील कर्ज रक्कम १,७९,८२०/- रुपयांचा भरणा केलेला आहे. उर्वरीत ८७ सभासदांची संस्थेनिहाय रक्कम १,८९,७२,२७०/- मात्र अपहार रक्कमेची जबाबदारी यातील त्यानंतर आरोपींनी स्वीकारली. तसेच सुवालाल देवालाल लोहार, तत्कालिन ज्युनि. ऑफिसर, प्रफुल्ल अमृतलाल वसावे तपासणीस अ.कुवा शाखा, देविदास पुंजरु पाटील तत्कालिन शिपाई तळोदा शाखा यांनी अपहार रकमेची जबाबदारी स्विकारुन त्यांचेकडील अपहारीत रक्कम रु. ३९,०३,९१५/- अपहार रकमेचा व्याजासह भरणा केला. उर्वरीत तीन कर्मचाऱ्यांनी तळोदा शाखेतील कर्ज खात्यात केलेल्या अपहाराशी संबध व जबाबदार नसल्याचे संमती / हमीपत्र / नोटरीत लिहुन देवुन नमुद केले

तथापि उर्वरीत धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तळोदा शाखेतील तत्कालीन तपासणीस (सेवानिवृत्त) पंढरीनाथ पुंडलिक मराठे, ईस्माईल बुऱ्हानखॉ पठाण धंदा- नोकरी तत्कालीन शाखाधिकारी (सेवानिवृत्त) रा. बद्री कॉलनी शहादा रोड तळोदा जि. नंदुरबार आणि जयराज चुनिलाल धानका, तत्कालिन शिपाई रा. दलेलपुर ता. तळोदा जि. नंदुरबार यांनी त्यांचेकडील अपहार रकमेचा संपुर्ण भरणा न करता फक्त ६ सभासदांकडील रुपये १२,८३,७३७/- रु. एवढया अपहारीत कर्ज रकमेचा व्याजासह भरणा केला. म्हणून प्रभारी पोलीस अधिकारी गुलाबराव पाटील यांनी उर्वरीत रक्कम १ कोटी ५० लाख ११ हजार ५४७/- रकमेचा अपहार केल्याचा गुन्हा तळोदा पोलीस ठाण्यात नोंदवला. पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर हे अधिक तपास करीत आहेत.

One thought on “धक्कादायक ! रूपे कार्डचा गैरवापर करीत मध्यवर्ती बँकेला लावला चुना; पीक कर्जाच्या माध्यमातून सुमारे 2 कोटीचा भ्रष्टाचार

  1. हे तर अती भयानक.कुंपणच शेत खातंय तर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!