नंदुरबार : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या जागांचा पोटनिवडणूक-२०२१ करीता कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
पोट निवडणुकीचा कार्यक्रम नमुना १ मध्ये तहसील कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, गाव चावडी तसेच पोटनिवडणूक होत असलेल्या विभाग/ निर्वाचक गणातील प्रत्येक गावात सूचना फलकावर तसेच जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे, असे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी कळविले आहे.
मतदारसंघाच्या क्षेत्रात शस्त्र बाळगण्यावर निर्बंध
दरम्यान, आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण मतदारसंघाच्या क्षेत्रातील शस्त्र परवानाधारकांकडील (राष्ट्रीयकृत व इतर बँकांचे सुरक्षा कर्मचारी, पोलिस कर्मचारी वगळता) शस्त्र बाळगण्यावर निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.
विशिष्ट परवाना धारकांच्या बाबतीत त्यांची गरज तपासून ठराविक कालमर्यादेसाठी परावाना धारकांनी शस्त्र बाळगण्याची परवानगी मागितल्यास त्यांच्या अर्जावर तपासून निर्णय घेण्यात येईल. निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर शस्त्र बाळगण्यावरील निर्बंध आपोआप रद्द होतील आणि जमा केलेली शस्त्रे परवानाधारकांना मतमोजणीच्या एका आठवड्यानंतर परत करण्यात येतील. विनापरवाना अवैध शस्त्रांचा वापर होणार नाही याकरीता राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पोलिस विभागाने कारवाई करावी, असेही जिल्हादंडाधिकारी श्रीमती खत्री यांनी आदेशात नमूद केले आहे.
छान वृत्त प्रसिद्ध!👌👌👌