प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांच्या संशयास्पदरित्या झालेल्या मृत्यूच्या चौकशीसाठी उत्तरप्रदेश पोलिसांनी विशेष अन्वेषण पथक स्थापन केले आहे. पोलिसांनी या मृत्यूविषयी कलम ३०६ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी महंत नरेंद्र गिरि यांचा शिष्य आनंद गिरि याला अटक करण्यात आली आहे, तर येथील लेटे हनुमानजी मंदिराचे पुजारी आद्याप्रसाद तिवारी आणि त्यांचा मुलगा संदीप तिवारी यांना कह्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. या दोघांची नावे महंतांनी मूत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात होती. आनंद गिरि याच्यावर महंत नरेंद्र गिरि यांचा मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. या घटनेच्या प्रकरणी ८ जणांची ‘लाय डिटेक्टर’ चाचणी (गुन्ह्याच्या प्रकरणात संबंधित आरोपी खरे बोलत आहेत कि खोटे, हे पडताळण्यासाठी
केली जाणारी चाचणी) करण्याची शक्यता आहे. या एका बांधकाम व्यावसायिकाचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी महंत नरेंद्र गिरि यांचा भ्रमणभाष संच जप्त केला असून त्याची पडताळणी करण्यात येणार आहे. मृत्यूपूर्वी महंत नरेंद्र गिरि यांनी भ्रमणभाषवरून चित्रीकरण केल्याचे सांगितले जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘प्रत्येक घटनेची चौकशी करून जो कुणी दोषी असेल, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल’, असे सांगितले.
२१ सप्टेंबरला सकाळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराज येथील बाघंबरी मठात येऊन महंतांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी ‘महंतांच्या पार्थिवाचे उद्या (२२ सप्टेंबर या दिवशी) शवविच्छेदन करण्यात येईल आणि त्यानंतर त्यांना समाधी देण्यात येईल’, असे सांगितले.