वाचकांचं मत :
प्रति,
मा. संपादक,
कॄपया प्रसिद्धीसाठी
हिंदू धर्मानुसार दिलेले आचार-विचार म्हणजेच एक आदर्श जीवन जगण्याची पद्धत आहे. यात प्रत्येका प्रती कृतज्ञताभाव म्हणजे चार ऋण सांगितले आहेत ते म्हणजे समाजऋण, पितृऋण, देवऋण व ऋषीऋण होय. यातील पितृऋण म्हणजेच मातापित्यांनी आपल्यासाठी जे केले त्या प्रतीचा कृतज्ञताभाव होय. यात जसे आई वडील जिवंत असताना त्यांची सेवा करणे आवश्यक आहे तसेच मृत्यूनंतरही त्यांना पुढची गती मिळण्यासाठी, त्यांचा मृत्यू नंतरचा प्रवास सुखकर होण्यासाठी श्राद्ध हा विधी धर्मशास्त्रानुसार सांगितला आहे. विविध प्राचीन धर्मग्रंथात श्राद्धविधी विषयीचे संदर्भ बघायला मिळतात. ऋग्वेदानुसार अग्नी देवाला केलेल्या प्रार्थनेत हवनीय द्रव्याच्या माध्यमातून स्वधा म्हणून दिलेली आहुती पितरांना पोहोचू दे असा उल्लेख दिसून येतो तर कुर्मपुराणानुसार पितर हे वंशजांच्या घरी वायू रूपाने येतात हा उल्लेख आहे. आदित्यपुराणातही श्राद्धविधी केले नाही तर रक्तदोष कसा निर्माण होतो याविषयी चा उल्लेख दिसून येतो. मार्कंडेय पुराणानुसारही श्राद्धविधी न केल्यास होणाऱ्या विविध त्रासांचे उल्लेख आपल्याला दिसून येतात. या प्राचीन धर्मग्रंथांच्या संदर्भावरून श्राद्धविधी न केल्याने पितर कसे रुष्ट होतात आणि त्यांच्या वंशजांना त्रास होऊ शकतो हे लक्षात येते. पैठणच्या संत एकनाथ महाराजांनी वडिलांच्या श्राद्धाचे जेवण आधी ज्या व्यक्तीला दिले त्याला महान पुण्य मिळून त्याचा कुष्ठरोगासारखा आजार बरा झाल्याचाही संदर्भ आहे. आज श्राद्धविधीला अयोग्य ठरवून त्यावर टीका होताना आपल्याला दिसून येते यातीलच एक म्हणजे जिवंत मातापित्यांचा सत्कार म्हणजे श्राद्ध होय. परंतु श्राद्धविधी हा मृत व्यक्तीचाच असतो. श्राद्धविधीत केलेल्या पिंडदाणामुळे, मंत्रोच्चार व विविध विधींमुळे चांगले परिणाम होतात हे प्रयोगाने सिद्ध झालेले आहे. त्यामुळे वर्षातील एक दिवस आपल्या पूर्वजांना स्मरूण त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत सर्वांनी एकत्रित येऊन हा विधी आनंदाने व मनात कुठलाही किंतु-परंतु न ठेवता श्रद्धापूर्वक करावा व त्याचा होणारा लाभ अनुभवावा असे वाटते.