सौर ऊर्जा विकून पैसे कमवण्याची शेतकर्‍यांना महासंधी

 

कुसुम योजनेचा लाभ घ्या; महावितरणचे आवाहन

नंदुरबार : नापीक आणि अकृषिक जमिनीचा वापर करून शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री कुसुम योजना (घटक अ) केंद्र शासनाद्वारे सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये निर्माण होणारी वीज महावितरणला विकून अथवा सौर प्रकल्पासाठी जमीन भाडेपट्टीवर देऊन उत्पन्न मिळवण्याची संधी शेतकर्‍यांना मिळणार आहे. त्यामुळे योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी घ्यावा असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
महावितरणच्या विभागीय कार्यालयाने ही माहिती दिली असून त्यात म्हटले आहे की, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरीसुध्दा याचा लाभ घेऊ शकणार आहेत. या योजनेअंतर्गत ०.५ ते २ मे.वॅ. क्षमतेचे विकेंद्रीकृत सौर ऊर्जा प्रकल्प प्राधान्याने शेतकरी, शेतकरी सहकारी संस्था, पंचायत, शेतकरी उत्पादक संस्था आणि पाणी वापरकर्ता संघटना हे सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करू शकतात आणि जर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक समभागाची व्यवस्था करण्यास सक्षम नसल्यास ते विकासकांद्वारे सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचा पर्याय निवडू शकतात. अशा परिस्थितीत भाडेपट्टी कराराद्वारे जमीन मालकाला त्यांच्या जमिनीचे भाडे मिळणार आहे.

हे प्रकल्प जमिनीवर सौर प्रकल्पाची उभारणी स्टिल्ट रचना वापरूनही उभारता येतील, जेणेकरुन शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीचा वापर भाडेपट्टीव्यतिरिक्त पिकांच्या लागवडीकरिताही होऊ शकेल. या योजनेत शेतकरी त्यांच्या बँक खात्यामध्ये विकासकाद्वारे जमिनीचे मिळणारे भाडे हे महावितरणमार्फत जमा करण्याचा पर्याय निवडू शकतात. हा सौर ऊर्जा प्रकल्प महावितरणच्या जवळच्या ३३/११ के.व्ही. उपकेंद्राशी थेट जोडला जाईल.

प्रधानमंत्री कुसुम योजना (घटक अ) अंतर्गत योजनेमध्ये निविदेद्वारे भाग घेण्याकरिता शेतकरी, शेतकरी सहकारी संस्था, पंचायत, शेतकरी उत्पादक संस्था आणि पाणी वापरकर्ता संघटना यांच्यासाठी कोणतेही आर्थिक निकष नाहीत. तथापि, विकासकाला या योजनेअंतर्गत भाग घेण्याकरिता पुढील अटी बंधनकारक राहतील. बयाणा रक्कम रु. १ लाख/मेगावॅट ,परफॉर्मन्सबँक गॅरंटी रु. ५ लाख/मेगावॅट, उद्देशिय पत्र जारी केल्यापासून १२ महिन्यांच्या आत सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वन करणे बंधनकारक राहील. वीज खरेदी करार प्रकल्प कार्यान्वित झालेल्या तारखेपासून २५ वर्षाकरिता रु. ३.१० प्रति युनिट दराने राहील.

या योजनेअंतर्गत महावितरणने ४८७ मे.वॅ. करिता निविदा जाहीर केल्या आहेत आणि निविदा भरण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०२१ आहे. या योजनेत शेतकर्‍यांनी मोठया संख्येने सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा, असेही आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. निविदेत भाग घेण्यासाठी महावितरणच्या www.etender.mahadiscom.in/eatApp  वेब पोर्टलवर भेट द्यावी, असे आवाहन महावितरणच्याा वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!