आनंदी जीवनासाठी भक्तियोग
आजच्या या जागतिक स्पर्धेच्या युगात भौतिक सुख म्हणजेच आनंद असे मानून प्रत्येक जण भौतिक सुखाच्या मागे धावतो आहे. आपले ध्येय काय व आपण ते कितपत साध्य केले ? हा विचार करायलाही आज कुणाला वेळ नाही. सततच्या या कामात कधी अपयश आले तर निराशा येते, नकारात्मकता येते. मग त्यातून सुटका करण्यासाठी मनुष्य विविध मार्ग अवलंबतो अगदी बरेच जण तर व्यसनाधीन झालेलेही बघायला मिळतात. पण खरा आनंद कशात आहे; हे शोधता येणे व तो प्राप्त करणे आवश्यक आहे. कोणतीही वाईट परिस्थिती आली किंवा घटना घडली तरीही न घाबरता सतत भगवंताच्या अनुसंधानात राहून तिचा स्वीकार केल्यास आत्मबळ मिळून त्या परिस्थितीला सामोरे जाता येते.
भक्तीचे दोन प्रकार आहेत. सकाम भक्ती व निष्काम भक्ती. सकाम भक्ती स्वेच्छेला प्राधान्य देते. कुठलीतरी ईच्छा मनात ठेवून केली जाते. तर निष्काम भक्ती ही ईश्वरईच्छेला प्राधान्य देते. भक्तांचे मनात कुठलीही इच्छा नसल्यामुळे देवतेला कुठली अपेक्षा ठेवून न स्मरता केवळ आनंद प्राप्तीसाठी स्मरणे म्हणजे निष्काम भक्ती होय. माझी निष्काम भक्ती करणाऱ्या भक्ताची मी सर्वतोपरी काळजी घेतो या आशयाचे वचन श्रीकृष्णाने श्रीमद्भगवगतेत दिलेले आहे व त्याची प्रचिती ही निष्काम भक्ती करणारा भक्त घेत असतो.
भक्ती योगाच्या बळावर कुठल्याही परिस्थितीत आनंदाने जीवन जगलेल्या व कठीण प्रसंगांचा आनंदाने सामना करणाऱ्या अनेक संतांची उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत. त्यातीलच संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, ब्रह्मर्षी नारद, संत मीराबाई, संत जनाबाई अशी कितीतरी उदाहरणे देता येतील जे अतिशय कठीण परिस्थितीतही खूप आनंदाने जीवन जगले ते केवळ भक्तीयोगाच्या जोरावर. सर्व संतांच्या आयुष्यात खूप कठीण व खडतर प्रसंग आल्याचे आपण त्यांच्या चरित्रात वाचतो. परंतु ते कधीही नकारात्मक झाले किंवा त्या प्रसंगांना घाबरुन आत्महत्या केली; असे वाचनात आले नाही. ही भक्तीची शक्ती आहे, ताकद आहे व आजच्या या ताण तणावाच्या वातावरणात आम्ही निश्चित अशी शक्ती अनुभवायला हवी. आज वेगवेगळ्या भौतिक सुखांच्या मागे धावत असताना, प्रत्येक गोष्ट पूर्ण करताना, छोटया छोटया प्रसंगातही खूप ताण तणाव येतो. अगदी तरुण उमेदीच्या वयातही मुले ह्या तणावामुळे आत्महत्येला प्रवृत्त झालेले आम्हाला दिसतात. भक्तीयोगानुसार अनेक संत केवळ भगवंताच्या नामाने भगवंताशी एकरूप होत तणावमुक्त व आनंदी जीवन जगले आहेत.
वायू पुराणांमध्ये भक्तीमार्गाचा उल्लेख आढळतो. श्रीमद्भगवद्गीतेत बाराव्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने भक्तीयोगाचे व भक्ती मार्गाचे महत्त्व विशद केले आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांनी तेराव्या शतकात सर्वांना सहज व सुलभतेने करता येणारा सोपा असा भक्तिमार्ग सर्व समाजाला सांगितला आहे. भक्ती योगानुसार आम्हाला भगवंताला प्राप्त करायचे असेल तर आमचे हृदय निर्मळ असायला हवे. भगवंत अतिशय शुद्ध आणि प्रेमळ आहे त्या भगवंताला प्राप्त करायचे असेल तर आम्हालाही तेवढे शुद्ध व प्रेमळ व्हावे लागेल. शुद्ध होने म्हणजेच मनाने शुद्ध होणे जे भगवंताला अपेक्षित आहे. मनाची शुद्धता म्हणजे दोष व अहम विरहित मन. मनात कुणाविषयी राग, द्वेष, लोभ नसावा, कुठलीही अपेक्षा नको स्वतःचे दोष व अहंकार ज्याला ओळखता येतो व जो ते दूर करण्याचे प्रयत्न करतो त्याचे मन निश्चितच निर्मळ होणार. जेव्हा षड्रिपूंचा नाश होतो तेव्हा मन आपोआप निर्मळ होते व सर्वांमध्ये आम्हाला भगवंताचे रूप अनुभवता येते. प्रत्येकात ईश्वर पाहणे व प्रत्येकाला ईश्वरा प्रमाणे वागणूक देणे असे झाले तर आम्ही आमच्या संस्कृतीचे जे ध्येय आहे ते म्हणजेच “वसुधैव कुटुम्बकम” ते निश्चितच पूर्ण होईल व सगळ्यांच्या मनात एकमेकांविषयी प्रेम भाव सहकार्याची भावना असल्याने कुठलेही वाद ताण तणाव न राहता सर्वांना आनंदी जीवन अनुभवता येईल ही भक्तीची शक्ती सर्वांनी अनुभवूया. नवविधा भक्तीमध्ये भक्तीचे नऊ प्रकार सांगितले आहेत श्रवण, किर्तन,स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आण आत्मनिवेदन अशा नऊ प्रकारच्या माध्यमातून भक्ती करता येते यातील पहिले तीन प्रकार परामेश्वरच्या प्रति श्रद्धा उत्पन्न करतात नंतरचे तीन प्रकार भगवंताच्या सगुण रूपाशी संबंधित आहे तर शेवटचे तीन प्रकार हे भाव आहेत ज्या माध्यमातून भगवंताशी एकरूप होऊन संपूर्ण तणावमुक्त जीवन जगता येते. अश्या हया भक्तीमार्गाचा अवलम्ब करून आपल्या आपेक्षांचा लय करत भगवंताला अनुभवु या व आनंदी जीवन जगू या.
– डॉ० पी. एस. महाजन, संभाजीनगर