फायनान्स कंपनीचे बनावट ऑफिस थाटून रकमा लुबाडणार्या गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश
नंदुरबार – बोलेरो गाडी चोरली नंदुरबार शहरातून, विकली मध्यप्रदेशात आणि पसार झाले राजस्थानला; असा आंतरराज्यीय खेळ खेळणार्या दोघांना येथील गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. मायक्रो फायनान्स कंपनीचे बनावट ऑफिस थाटायचे, रकमा लुबाडायच्या आणि भाडेतत्वावर वाहन घेऊन पसार व्हायचे व परस्पर त्याचीही विल्हेवाट लावायची अशी पध्दत वापरणार्या गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश करण्यात यामुळे यश मिळाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाने दिली आहे.
या माहितीत म्हटले आहे की, दि.१८ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी नंदुरबार शहरातील मनोहर सतीलाल बागुल (वय ३४) धंदा- शेती रा. महादेव नगर, जगतापवाडी, नंदुरबार यांच्या मालकीचे ३ लाख रुपये किमतीचे बोलेरो वाहन गांधीनगरमधील घरासमोरुन चोरीस गेल्याचा गुन्हा नोंद झाला होता. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी गुन्ह्याच्या पध्दतीचा अभ्यास केला. सहायक निरिक्षक संदिप पाटील, हवालदार प्रमोद सोनवणे, विनोद जाधव, पोलिसनाईक राकेश मोरे, पोकॉ विजय ढिवरे, अभय राजपुत, आनंदा मराठे यांचे पथक कार्यरत केले. परिसरातील सीसीटीव्ही तपासले. सशयीत तरुण फिर्यादीकडे टाकून गेलेल्या मोटर सायकलची माहिती घेतली. तसेच संपर्कासाठी वापरलेल्या मोबाईल क्रमांकाची माहिती घेतली. सर्व माहितीचे विश्लेषण करुन संशयीत आरोपी राजस्थान राज्यात बारां नावाच्या शहरात असल्याची खात्री केली. त्यानुसार पथकाने दिनांक २५ सप्टेबर २०२१ रोजी बारां शहरात दोन दिवस शोध घेऊन मनिष कैलाशचंद्र तेली व आनंदीलाल जयचंद तेली, दोन्ही रा.धानमंडी, मंदसौर या दोन्ही संशयीतांना स्थानिक पोलीसांच्या मदतीने एका लॉजमधून ताब्यात घेतले.
त्यांना बोलते केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. हे आरोपी गुगल मॅपवरुन वेगवेगळ्या गावांचा शोध घेऊन त्या त्या गावांना भेटी देतात. भेटीदरम्यान ते गावात एक ऑफीस स्थापन करतात. त्यात मायक्रो फायनांन्स कंपनी असल्याचे बॅनर लावून परिसरात कंपनीचे नाव व स्वतःचा क्रमांक असलेल्या पीवळ्या पावत्या वाटप करतात. त्याद्वारे १००/२०० रुपयांमध्ये मोठा इंन्शुरन्स करण्यासाठी लोकांना आमीष देतात. त्यानंतर संपर्क करणा-या ग्राहकांना बचत गटाचे मार्फतीने ३० ते ४० हजार रुपये कर्ज मिळवुन देण्यात येईल असे सांगून प्रोसेसिंग फीचे नावाने प्रत्येकी २ ते ३ हजार रुपये जमा करतात. दोन तीन दिवसात जी काही रक्कम जमा होईल ती घेऊन ते पोबारा करतात. फसवणूक होणारी वैयक्तीक रक्कम छोटी असल्याने शक्यतो कोणी पोलीसात तक्रार करीत नाही. तसेच दुस-या वेळी ज्या ठिकाणी फसवणूक केली आहे तेथून ३०० ते १००० किमी अतंरावर दुसरे ठिकाण निवडतात त्यामुळे ते सहजासहजी पोलीसांच्या जाळ्यात देखील सापडत नाहीत.
हीच पध्दत वापरून नंदुरबार येथे देखील त्यांनी गांधी नगरमध्ये एक घर भाडेतत्वावर घेऊन सुर्योदय मायक्रो ग्रुप लिमीटेड कंपनी या नावाने ऑफीस सुरु केले होते. तथापि नंदुरबार येथे अपेक्षीत ग्राहक न मिळाल्याने त्यांनी नमुद गुन्ह्यातील फिर्यादी यांना गाडी भाडेतत्वावर घेण्याचे आमीष देऊन गाडी घेऊन पोबारा केला होता. त्यानंतर ते अशा प्रकारे फसवणूक सुरु करण्यापुर्वीच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
सशंयीतांकडे चोरलेल्या गाडीशिवाय २ लॅपटॉप, २ मोबाईल हॅन्डसेट १ एलएडी टिव्ही, २ कॅम्प्युटर मॉनीटर, १० बनावट नंबर प्लेट्स, बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड,मतदार ओळखपत्रे ड्रायव्हिंग लायसेन्स कंपनीचे बनावट ओळखपत्रे असा एकूण ३ लाख ४८ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहायक निनिक्षक संदिप पाटील, हवालदार प्रमोद सोनवणे, विनोद जाधव, राकेश मोरे, पोकॉ विजय ढिवरे,अभय राजपुत,आनंदा मराठे यांचे पथकाने केली असुन मा. पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री.पी.आर.पाटील यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान पोलीस अधिक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की, बाहेर राज्यातील आरोपी विश्वास संपादन करुन कमी व्याजाचे कर्ज मिळवून देणे, कमी पैशात जास्त रकमेचा विमा काढून देणे, भीशी चालविणे याद्वारे फसवणूक करतात. असे आरोपी हे बनावट कागदपत्रांद्वारे असे गुन्हे करत असल्याने त्यांचा शोध घेणे कठीण असते. तरी नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडता असा प्रकार आपल्या परिसरात होत असेल एक दक्ष नागरिक या नात्याने तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यास सुचित करावे. तसेच परराज्यातील लोकांना भाड्याने घरे अथवा वाहने देतांना त्यांची माहिती पोलिसठाण्यात अवश्य द्यावी.