नंदुरबार – पोलिसांनी धडक मोहीम सुरू केल्यामुळे दादा, मामा, बाबा, काका आणि तत्सम शब्दांचा किंवा चिन्हाचा उपयोग करून लिहिलेल्या नंबर प्लेट तसेच प्रमाणबद्ध आकारात नंबर न लिहिता भलत्याच आकारात लिहिलेले असल्यास त्या वाहनधारकांना आता दंडात्मक कारवाईला सामोरे जावेेे लागणार आहे.
वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक यांना तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी लेखी आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार 27 सप्टेंबर 2021 पासून ही कारवाई सुरू झाली आहे. नंबरप्लेट दिसत नसलेली वाहने, नंबरप्लेट वर चिखल लागलेली वाहने, कोरी नंबर प्लेट असलेली वाहने, नंबर प्लेटवर डांबर लागलेली वाहने, फॅन्सी नंबर प्लेट असलेली वाहने, नियमाप्रमाणे वाहनाच्या प्रकारानुसार ठरवून दिलेल्या बाजुस आवश्यकते नुसार नंबरप्लेट नसलेली वाहने इ. वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये दंडात्मक कार्यवाही करणे सुरू झाले आहे. प्राप्त माहितीनुसार नंदुरबार शहर वाहतूक शाखेने आतापर्यंत 100 हून अधिक वाहनधारकांवर कारवाई केली. प्रत्येक पोलिस ठाण्यात अंतर्गत देखील अशी कारवाई सुरू झाली आहे.