गावांची, वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याची कार्यवाही सुरू

     जळगाव – जिल्ह्यातील गावे, वस्ती आणि रस्त्यांची नावे जातीवाचक असल्यास ती बदलून अशी सर्व गावे, वस्ती आणि रस्त्यांना महापुरुष व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.
सामाजिक न्याय विभागाने जातीवाचक नावे बदलण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर गठित जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील आदी बैठकीस उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले, सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृध्दीगंत होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील गावे, वस्ती आणि रस्त्यांची नावे जाती वाचक असल्यास ती बदलावीत. त्याऐवजी थोर महापुरुषांची नावे किंवा लोकशाही मूल्ये वृध्दिंगत होतील, अशी नावे द्यावीत. त्यासाठी संबंधित यंत्रणांनी समाजकल्याण विभागाला सहकार्य करावे.

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ३३ जातीवाचक वस्त्यांची नावे बदलण्यात आली असून त्यांना महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत, अशी माहिती समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. पाटील यांनी बैठकीत दिली. त्यापैकी भुसावळ तालुका-३, भडगाव-१, एरंडोल-३, पाचोरा-७, रावेर-१, जामनेर-१०, अमळनेर-२ या वस्त्यांची माहिती प्राप्त झाली आहे. तर यावल, बोदवड, चाळीसगांव, चोपडा, धरणगांव, जळगांव, मुक्ताईनगर, पारोळा या तालुक्यांचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!