नंदुरबार – लाच घेणे हा शासकीय सेवेचा अविभाज्य भाग बनवून सामान्य लोकांना कागदी मान्यतेसाठी झुलवायचे आणि रग्गड पैसा कमवायचा अशा प्रवृत्तींना धडा शिकवणारी ज्यांनी सेवा बजावली व सरकारी लाचखोरांच्या मनात ज्यांनी धडकी भरवली ते येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाचे जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष टि.जाधव दिनांक 30 सप्टेंबर रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.
नाशिक विभागीय कार्यालयातर्फे सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा सन्मान करण्यात आला तर नंदुरबार जिल्हा कार्यालयातर्फेही कोरोना पार्श्वभूमीवर मोजक्या नागरिकांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यातील शिरीष टि. जाधव यांचा कार्यकाळ अधिक चमकदार राहिला. या कालावधीत अनेक शासकीय आणि निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर लाच स्वीकारल्या प्रकरणी कारवाई झाली. तब्बल 51 आरोपींवर कारवाई झाली. लोकसेवकांवर अन्याय होऊ न देता येणाऱ्या तक्रारदाराला त्यांनी न्यायचं दिला. मुंबई ,अहमदनगर, रायगड, ठाणे, ग्रामीण धुळे, दोंडाईचा, मुंबई, वरळी येथे आणि आता नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये त्यांची आतापर्यंत सेवा झाली. जादूच्या म्हणजे हस्तकरामतीचे मनोवेधक खेळ करण्याची आगळीवेगळी कला त्यांनी जोपासली आहे. कोरोना काळात त्याच माध्यमातून विविध संदेश देणाऱ्या मनोरंजक क्लिप व्हायरल करून त्यांनी जनजागृती करण्याचे अनोखे तंत्र वापरले होते. त्यांचे ते जादूचे प्रयोग अनेकांना भावले. मैत्री जोडणारा सुस्वभावी सुसंवादी अधिकारी म्हणूनही ते ओळखले जातात. त्यांच्या पुढील वाटचालीला अधिकारी मित्र गणाने शुभेच्छा व्यक्त केल्या.