अनुसूचित जाती-जमातीच्या अर्जदारांना सुवर्णसंधी; ‘या’ योजनेतून सहज मिळतंय वीज कनेक्शन

धुळे – अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने घरगुती वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने १४ एप्रिलपासून सुरू करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेत जळगाव परिमंडलातील २२१ ग्राहकांना वीजजोडणी देण्यात आली आहे. ६ डिसेंबर २०२१ पर्यत या योजनेचा लाभ घेता येणार असून गरजू नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती जगभरात १४ एप्रिल २०२१ रोजी साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्तींचे जीवन प्रकाशमान करण्‍याच्या दृष्टीने वीज जोडणी कार्यक्रम १४ एप्रिल २०२१ ते ६ डिसेंबर २०२१ अर्थात बाबासाहेबांची जयंती ते पुण्यतिथी या कालावधीत राबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेत जळगाव परिमंडलात आजपर्यंत २२१ अर्जदारांना वीजजोडणी देण्यात आलेली आहे. यात जळगाव मंडलात १३२, नंदुरबार मंडलात ४८ तर धुळे मंडलात ४१ ग्राहकांना वीजजोडण्या देण्यात आलेल्या आहेत.

असा घेता येईल लाभ
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अर्जदाराकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, वीज जोडणीसाठी करण्यात येणाऱ्या विहित नमुन्यानुसार आवश्यक कागदपत्रे उदा.आधार कार्ड, रहिवासी दाखला इ. आवश्यक आहे. तसेच अर्जदारांनी वीजजोडणीसाठी अर्ज केल्याच्या ठिकाणी यापूर्वीची थकबाकी नसावी. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने महावितरणच्या विहित नमुन्यात कागदपत्रासह ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. शासनमान्य विद्युत कंत्राटदारांकडून वीज मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. लाभार्थ्यास ५०० रुपये इतकी अनामत रक्कम महावितरणकडे एक रकमी जमा करण्याचा अथवा सदर रक्कम ५ समान मासिक हफ्त्यांमध्ये वीजबिलाद्वारे भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. अर्जदाराचा परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या तरतुदीच्या अधीन राहून वीजजोडणी उपलब्ध करण्यात येईल. महावितरणद्वारे प्राप्त अर्जानुसार ज्या अर्जदाराच्या घरी वीज जोडणी नाही अशा लाभार्थ्यांना विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास पुढील १५ कार्यालयीन दिवसांत वीजजोडणी देण्यात येईल. अर्जदारास वीजजोडणीसाठी विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध करावी लागणार असल्यास महावितरणद्वारे स्वनिधी अथवा जिल्हा नियोजन विकास निधी अथवा इतर उपलब्ध होऊ शकणाऱ्या निधीमधून काम प्राधान्याने हाती घेऊन पूर्ण करण्यात येईल व वीजजोडणी देण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!