(योगेंद्र जोशी)
अखंड धुळे जिल्हा असताना नंदुरबारचा आदिवासी भाग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुध्दा कुपोषण, दारिद्र्य, निरक्षरता, बेरोजगारी, गरिबीच्या दळभद्री चरकात पिळवटून निघत होता. त्या नंदुरबार उपविभागाला 30 वर्षांपूर्वी स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आणण्याची ज्यांनी किमया केली आणि येथील जनतेच्या भाळी लिहिलेले अठरा विश्व दारिद्र्य संपवणारे विकास पर्व ज्यांनी साकारले, ते महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान भाजपाचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांचा आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी वाढदिवस साजरा होत आहे. आपल्या अतुलनीय कार्यामुळे जनतेच्या हृदयातील तावीत बनलेला हा जननायक मात्र मागील आठ महिन्यांपासून आजारपणाशी झुंज देत असून अनेक महिन्यांपासून त्यांचा मुक्काम मुंबईतच होता. रोज भरणारा त्यांचा जनता दरबार त्यामुळे सुना पडला होता. पण, या लढवय्या नेत्याने अखेर आजारपणालाही हरवले आहे. आता पुन्हा जनतेच्या दरबारात हजर होण्यासाठी ते उत्सुक झाले आहेत. आपल्या या लाडक्या नेत्याला पाहण्याची लोकांची उत्कंठा शिगेला पोहोचली असल्याने लोकांसाठी अर्थातच ही आनंद वार्ता ठरली आहे.
याला कारण सामान्य जनतेच्या प्रती त्यांनी जोपासलेली आपुलकी, सामान्य लोकांना खरोखर उपयोगी पडण्याची त्यांनी अवलंबलेली कार्यपद्धती आहे. सुडाचे राजकारण त्यांनी कधी केले नाही. विश्वासघात किंवा कारस्थान यावर आधारलेले राजकारण त्यांनी कधी केले नाही. ‘कारस्थान’ नव्हे ‘लोकसेवा’ हाच त्यांच्या कार्याचा आत्मा आहे, असं अनेकदा लोकांच्या निदर्शनास आले. विधायक आणि विकासात्मक कार्य हाच त्यांच्या राजकारणाचा भक्कम पाया राहिला. हे संपूर्ण जिल्ह्याने नव्हे उभ्या महाराष्ट्राने अनुभवले. ते गरिबांचा आधार बनले म्हणून त्यांना कायमस्वरूपी जनाधार लाभला आहे. ज्यांना असा जनाधर मिळवता येत नाही, त्यांना कटकारस्थानाच्या वाटेने जावे लागते. डॉ . गावित यांना मंत्रिपद मिळू नये, यासाठी खटपट करणाऱ्या नेत्यांच्या उदाहरणावरून हे कधीच लोकांच्या निदर्शनास आले आहे.
या उलट मंत्री पदाची शक्ती दीर्घकाळ हाती असतानाच्या कार्यकाळात डॉ . गावित यांनी अनेकांना राजकारणात उभे केले, नावारुपाला आणले. धडगाव अक्कलकुवा पासून अनेक नावं यात आहेत. त्यातलेच काही जण आज मात्र त्यांना आव्हान द्यायला उभे राहून कृतघ्न बनतात, तेव्हा जनतेच्या डायरीत निश्चितच त्याची वेगळी नोंद घेतली जात असते. कितीही कटकारस्थान विरोधकांनी रचले तरी वेट अँड वॉच भुमिकेत राहणेच डॉ विजयकुमार गावित यांनी स्विकारले. जे वर्तमानातही त्यांना उपयोगी पडत आहे. त्यांची बाजू सत्य ठरवत आहे. कारण शक्तीचा आणि युक्ती अहंकाराने नव्हे तर संयमाने वापर करायचा असतो, हे त्यांना पक्के माहित आहे. प्रसंगी विरोधकालाही मदत करून मनाने जिंकण्याचे परिपक्व राजकारण ते याच जोरावर करताना दिसले आहेत.
आज त्यांना विकासरत्न विशेषण देऊन अनेकजण संबोधतात. याला कारण त्यांचे विकास कार्य आहे. परिवर्तनाचा नारा देत त्यांनी या भागात विकास गंगा आणण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न चालवले होते, त्या काळी शक्तिमान असलेले बहुतांश राजकारणी त्यांच्या विरोधात होते. जसे अभिमन्यूपुढे चक्रव्यूह भेदण्याचे आव्हान होते. परंतु त्या सर्व विरोधी राजकारणाला छेद देऊन आधी त्यांनी जिल्हा निर्मिती घडवली. लगेचच सर्व शासकीय विभागाच्या आवश्यक इमारती उभारून जणू जनतेच्या दारात प्रशासन आणले. नंतर क्रमाने जलप्रकल्प, रस्ते विकसीत करून शेतीचा विकास, दुर्गम भागातील संपर्क आणि दुर्गम भागातील सेवा गतिमान केल्या. दूरदृष्टी ठेवून त्यांनी केलेल्या निर्णयामुळे फक्त भौगोलिक रूप बदलले नाही तर प्रत्येक झोपडीपर्यंत शासकीय लाभ सुद्धा पोहोचणे सुरू झाले. दारिद्र्यात पिचणारा मोठा जनसमूह आर्थिक दृष्ट्या सशक्त बनला. अलीकडेच लाखो बेघरांना घरकुल प्राप्त झाले, राज्यभरात आश्रम शाळांच्या इमारती उभ्या राहिल्या, आदिवासी मुलांना आधुनिक सेवा सुविधा आणि शिक्षण मिळू लागले, बेरोजगारांना कितीतरी माध्यमातून आधार मिळाला. शेतकऱ्यांना सिंचन व्यवस्थेसह शेती साहित्य मिळाले. (प्राप्त झालेल्यांच्या तुलनेत वंचित राहिलेल्यांची संख्या लक्षणीय आहे असे जरी सत्य असले तरी, कोणत्याही शासनाला आणि लोकप्रतिनिधीला शंभर टक्के लोकांना लाभ देणे शक्य नसते, हे देखील येथे लक्षात घेतले पाहिजे.)
हे परिवर्तन घडवणे आधीच्या शक्तिमान नेत्यांना का शक्य झाले नाही? राजकीय इच्छा असेल तर सर्व घडते हे एकमेव डॉक्टर विजयकुमार गावित दाखवू शकले. मागील तीस वर्षात हे त्यांनी अनेकदा आणि अनेक विकासकामांबबत दाखवून दिले आहे. म्हणूनच नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात नव्हे तर महाराष्ट्रात त्यांचे स्थान कायमच आगळे वेगळे राहणार आहे. त्यांच्या या विकास कार्याची पताका फडकवायला आता त्यांच्या कन्या संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित आणि डॉक्टर सुप्रियाताई गावित समर्थपणे उभ्या ठाकल्या आहेत. खासदार म्हणून डॉक्टर हिनाताई गावित यांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात घडवलेले विकासात्मक परिवर्तन आणखीनच खास म्हणावे. दर्जाहीन रुग्णसेवा आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभाव यामुळे बदनाम असलेल्या नंदुरबार जिल्ह्याला त्यांच्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळाले. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण वेगाने पार पडले. बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना अनेक उद्योग मिळाले. परिवर्तनाचा नारा देऊन डॉक्टर विजयकुमार गावी यांनी तीस वर्षांपूर्वी सुरू केलेला विजय रथ यापुढेही निर्वेधपणे चालू राहावा, हीच भावना समस्त जनतेतून व्यक्त होताना दिसते. सगळ्यांचे लाडके साहेब डॉक्टर विजयकुमार गावित यांना दीर्घ आयुरारोग्य लाभो, हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा! – योगेंद्र जोशी, नंदुरबार.