जमावबंदीचे पालन करून 31 डिसेंबर साध्या पद्धतीने साजरा करा ; जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

 

नंदुरबार : कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये “ओमिक्रॉन” हा नवीन विषाणू आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये मोठ्या तीव्रतेने पसरण्याची शक्यता असल्याने या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात एकत्र न येता 31 डिसेंबर व नूतन वर्ष साध्या पद्धतीने साजरा करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.

नूतन वर्ष स्वागत शांततेत व सुस्थितीत पार पाडण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. सदर आदेशाचे कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 , साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी परिपत्रकात म्हटले आहे की, कोरानाच्या अनुषंगाने 31 डिसेंबर 2021 रोजी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व 1 जानेवारी 2022 रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने घराबाहेर न पडता नववर्षांचे स्वागत घरीच साधेपणाने आणि शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन साजरा करावा. जिल्ह्यात 25 डिसेंबर पासून रात्री 9 वाजेपासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली असून याचे पालन सर्व नागरिकांनी करावे.

 

     31 डिसेंबर 2021 व नूतन वर्षांच्या स्वागताकरिता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या 50 टक्के पर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या 25 टक्के च्या मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी राहील. सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सामाजिक अंतराचे पालन, मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष द्यावे, तसेच सदर ठिकाणी निर्जंतूकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. नागरीकांनी 31 डिसेंबरच्या दिवशी बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सामाजिक अंतराचे पालन करावे, तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्यादृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.

नववर्षांच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. नूतन वर्षांच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाचवेळी गर्दी न करता सामाजिक अंतराचे पालन करावे. तसेच आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. फटाक्यांची आतिषबाजी करु नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

कोविड-19 व विशेषत्वाने ‘ओमिक्रॉन’ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगर विकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या मार्गदर्शक सूचनाचे व नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच परिपत्रकानंतर 31 डिसेंबर 2021 व नूतन वर्ष सुरु होण्याआधी नवीन काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे.

One thought on “जमावबंदीचे पालन करून 31 डिसेंबर साध्या पद्धतीने साजरा करा ; जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

Leave a Reply to प्रा.पुरुषोत्तम पटेल Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!