नंदुरबार – अतिवृष्टीमुळे अनेकांचे पीक जमीन वाहून गेले. त्या नुकसानग्रस्त शेतकर्यांना दरहेक्टरी ५० हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत का? असा जाहीर प्रश्न विचारतानाच, जनता आर्थिक संकटात असल्याने व्यवसायिकांनी बंदमध्ये सहभागी होऊ नये; असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी यांनी केले आहे.
याविषयी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सातत्याने दीड वर्षापासून कोरोना काळामुळे नंदुरबार जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या व्यवसायांवर संकटे येत आहे व सर्व छोटे मोठे व्यवसाय मोडकळीस आले आहेत. जेमतेम आता कुठे सुरुवात होत असतानाच बंद पुकारणे कितपत योग्य आहे ? आर्थिक संकटात आलेल्या सामान्य लोकांना पुन्हा आर्थिक आघात करण्यासारखे आहे. म्हणून आम्ही सर्व जनतेला आवाहन करतो कि अशा जनता द्रोही आंदोलनात कोणीही सहभागी होऊ नये.
विजय चौधरी यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, एकीकडे राज्यातले शेतकरी आत्महत्या करीत आहेत, वीज आणि बँकांच्या वसुलीने त्रासलेला आहे असे असतांना राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकर्यांना आधार वाटेलसे काहीही करू शकलेली नाही आणि कल्याणकारी योजनाही देऊ शकलेले नाही. ते पाप झाकण्याासाठीच महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि त्यांचे समर्थन करणार्या संघटना योगी सरकारला विरोध दर्शवत बंद आंदोलन पुकारण्याची नौटंकी करीत आहे.
वास्तविक भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारने सातत्याने शेतकरी हिताच्या योजना राबवणे सुरु ठेवले आहे. शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून माननीय मोदीजींनी शेतकर्यांच्या हाती पैसा दिला, असे विजय चौधरी यांनी म्हटले आहे.