नंदुरबार – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन येत्या 12 फेब्रुवारी 2022 ला नंदुरबार शहरात होणार असून हे अधिवेशन ऐतिहासिक ठरेल; अशा स्वरूपात होणार असल्याचा विश्वास अभाविपचे पश्चिम क्षेत्रिय संघटनमंत्री देवदत्त जोशी यांनी केला.
येथील कन्यादान मंगल कार्यालयात रविवारी अभाविपच्या प्रदेश अधिवेशना संदर्भात पश्चिम क्षेत्रिय संघटनमंत्री देवदत्त जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी दीपप्रज्वलनासह सरस्वती माता आणि स्वामी विवेकानंद प्रतिमांचे पूजन करण्यात आले. व्यासपीठावर अभाविपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. मनिष जोशी, नंदुरबार जिल्हा प्रमुख डॉ. दिनेश खरात, जिल्हा संयोजक राजेंद्र पावरा उपस्थित होते. याप्रसंगी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, भारतीय विद्यार्थी परिषदेचे 56 वे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन येत्या फेब्रुवारी महिन्यात नंदनगरीत होणार आहे. नव्या पिढीला अभावीप कळावे यासाठी अधिक जोमाने कामाला लागणे गरजेचे आहे. अधिवेशनाच्या माध्यमातून आपले कार्य सर्वव्यापी होण्यासाठी प्रयत्न करावे, असेही आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. डॉ.मनिष जोशी यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कार्यकर्ता हायटेक पद्धतीने या अधिवेशनानिमित्त येणार असून आदिवासी संस्कृती, वर्तमान कार्यकर्ते आदींचा समावेश असेल. कायमस्वरूपी स्मरणात राहणारे अधिवेशन विद्यार्थ्यांच्या जीवन कार्याला निश्चितच दिशा देणारे ठरेल. प्रा. डॉ. दिनेश खरात यांनी अधिवेशनास संदर्भात प्रास्ताविकातून भूमिका मांडली. याशिवाय बैठकीत प्रा. गिरीश महाजन, अभिजीत खेडकर, प्रकाश चौधरी, शशिकांत घासकडबी, प्रा. एच. के. चव्हाण, गौरीशंकर धुमाळ, पंकज पाठक, राजू पावरा, ताज्या पावरा आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विनया मोडक यांनी केले.