..तर आमदार कार्यालयाजवळ स्फोट होऊन झाली असती प्राणहानी !

नंदुरबार – शहरातील आमदार कार्यालयाजवळील वीज वितरणच्या ट्रांसफार्मरवरील केबलचे जबरदस्त स्पार्किंग होऊन अचानक आगीचे मोठ्ठे लोळ उठले. हे स्पार्किंग एवढे जबरदस्त होते की, दिवाळीचे बॉम्ब फुटावे तसे मोठे आवाज करीत सर्व दिशेने मोठ्या ठिणग्या पडत होत्या. होणारा आवाज आणि ते भयावह दृष्य पाहून त्या प्रसंगी रस्त्याने जाणारे देखील काही क्षण हादरून गेले. काही मिनिटे खाली स्पार्किंग झाले नंतर ट्रांसफार्मर च्या भोवताली आणि थेट दुसऱ्या पोलपर्यंत तडतडाट करीत वीजांचं तांडव चालावे तसे स्पार्किंग होत अखेरीस मोठा आवाज करून तेथील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे परिसरात अंधकार पसरला होता. आग वाढली असती तर तिथे उभी असलेली लाखो रुपयाची कार जळून खाक झाली असती शिवाय 100 केवी क्षमतेचा तीन लाखाहून अधिक रुपयांचा ट्रांसफार्मर देखील जळून खाक झाला असता.

आमदार कार्यालयाच्या बाजूला वाहत्या रस्त्यालगतच हा ट्रांसफार्मर उभा आहे. त्या ठिकाणी नेहमी चारचाकी व दुचाकी वाहने पार्क केलेले असतात. बाजारहाट करणाऱ्यांपैकी तसेच त्या परिसरातील कार्यालयांमधील ये-जा करणाऱ्यांपैकी अनेक जण तिथून वावरत असतात. यामुळे हे स्पार्किंग दिवसा घडले असते, तर काय अनर्थ घडला असता याचा अंदाज येतो. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, तिथून जवळच उभी असलेली कार पेटून अथवा ट्रांसफार्मर पेटून मोठ्ठा स्फोट झाला असता तर भली मोठी आग लागण्याचा अनर्थ ओढवण्याची शक्यता होती तसेच ही घटना दिवसा घडली असती तर तिथे प्राणहानी झाली असती; परंतु सुदैवाने असा कोणताही अनर्थ घडलेला नाही.
     दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी वेळीच दखल घेऊन तातडीने दुरुस्त्या करीत अत्यंत तत्परतेने त्या परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करून दिला. अतिरिक्त कार्यकारी अभियंता मनीषा कोठारी यांनी याविषयी सांगितले की ट्रांसफार्मरला कोणताही धक्का बसलेला नाही. पाऊस पडल्यामुळे अशा घटना घडत असतात. एल टी वायर स्पार्किंग होऊन जळून खाक झाली आहे. त्या व्यतिरिक्त कोणतीही नुकसान नसून वीज पुरवठा पूर्ववत सुरू केला आहे, असेही मनिषा कोठारी म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!