नंदुरबार – नंदुरबार आणि शहादा येथील महत्त्वाचे मंदिर चोरी प्रकरण तसेच वेगवेगळे गुन्हे उघडकीस आणण्याची कामगिरी बजावणारे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक किरण खेडकर यांच्यासह जिल्हा पोलीस दलातील अन्य संबंधित अधिकारी व अंमलदार यांचा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. श्री बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा पोलीस दलाच्या कार्यपद्धती विषयी महानिरीक्षक यांनी समाधान देखील व्यक्त केले.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. डॉ. श्री.बी.जी. शेखर पाटील हे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी नंदुरबार येथे आले होते. त्या दरम्यान दि.02/03/2023 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील संवाद हॉल येथे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व शाखा प्रभारी अधिकारी यांच्या करीता गुन्हे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. गुन्हे आढावा बैठकी दरम्यान नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. डॉ. श्री.बी.जी. शेखर पाटील यांनी मागील दोन वर्षांच्या कालावधीतील गुन्ह्यांच्या विविध प्रकारात झालेली वाढ / घट, गुन्हे शाबितीचे प्रमाण, अवैध धंद्यांविरुध्द कारवाई, मुद्देमाल निर्गती, मालमत्तेविरुध्दचे ना उघड गुन्हे, प्रतिबंधक कारवाई तसेच प्रशासकीय बाबींचा आढावा घेतला. तसेच जानेवारी 2022 ते डिसेंबर- 2022 या कालावधीत समन्स वॉरंट बजावणी, खावटी वॉरंट बजावणी, CCTNS कामकाज, मुद्देमाल निर्गती तसेच वर्षभराच्या काळात नंदुरबार जिल्हा घटकात दाखल मंदीर चोरीचे गुन्हे उघडकीस आणून आरोपीतांना अटक करून त्यांचेकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करणाऱ्या पोलीस तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांचा प्रमाणपत्र तसेच पुष्पगुच्छ देवून याप्रसंगी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यात शहादा येथील सुघोषाघंट मंदीर एवंम जैन मंदीर दादावाडी व दंडपाणेश्वर गणपती मंदीर येथील चोरी उघडकीस आणल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर व त्यांच्या पथकाचा सत्कार करण्यात आला. तसेच देवमोगरा माता मंदीर बडीपाडा, विसरवाडी येथील मंदीर चोरीबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. नितीन पाटील व त्यांच्या पथकाचा सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे सन 2022 मध्ये उत्कृष्ट समन्स बजावणीसाठी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार, उपनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दिनेश भदाणे, उत्कृष्ट नॉन बेलेबल वॉरंटच्या बजावणीसाठी म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. निवृत्ती पवार, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. नितीन पाटील, खावटी वारंटच्या उत्कृष्ट बजावणीसाठी व CCTNS च्या फॉर्म फिडींगसाठी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार, तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. पंडीत सोनवणे तसेच वर्ष भरातील काळात मुद्देमालाची उत्कृष्ट निर्गती केल्याबद्दल नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर वारे विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. नितीन पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या या प्रसंगी सत्कार करण्यात आला.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्या गुन्हे प्रकटीकरण, गुन्हे निर्गती, मुद्देमाल निर्गती, समन्स वॉरंट बजावणी व सी. सी. टी. एन. एस. पोर्टलच्या कामकाजाबाबत तसेच जिल्हा पोलीस दलाच्या एकंदरीत कामकाजाबाबत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.डॉ.श्री.बी.जी.शेखर पाटील यांनी समाधान व्यक्त केले.