अनुदानित युरिया चोरांचे रॅकेट उघड होणार का? कंटेनर जप्तीमुळे शहाद्यातील सूत्रधार चर्चेत

नंदुरबार – शहाद्यातील कृषी अधिकाऱ्यांच्या सावधगिरीमुळे चोर बाजारात विकण्याच्या इराद्याने अवैधपणे वाहून नेला जाणारा शहादा येथील अनुदानीत (रासायनीक खत) युरियाचा मोठा साठा पकडला गेला. शेतकऱ्यांच्या हक्काचा अनुदानित युरिया कोण गायब करतो, हे उघड केले जाण्याची अपेक्षा असतानाच मात्र ही कारवाई घडवणाऱ्या अधिकाऱ्यांवर वरिष्ठ स्तरावरून दबाव येणे सुरू झाल्याची चर्चा आहे. यामुळे युरिया चोरीच्या रॅकेटमध्ये शहादा-नंदुरबारपासून मुंबईच्या वरिष्ठ स्तरापर्यंत अडकलेली साखळी उघड होणार की नाही? खतांचा काळाबाजार करणारा शहाद्यातील मास्टरमाईंड उघड होणार की नाही? असे प्रश्न चर्चेत आले आहेत.
अधिकारी पाठलाग करीत असल्याचे पाहून शहाद्यातून दोंडाईचा मार्गे पसार झालेला युरियाचा तो कंटेनर सोनगीर पोलिसांच्या मदतीने धुळे तालुक्यातील लामकानी चौफुलीवर पकडण्यात आला. तेव्हा शेतकऱ्यांच्या हक्काचा अनुदानित युरिया कोण कसा गायब करतो, याचा भांडाफोड झाला; असा दावा कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
शहाद्यापासून केला पाठलाग
 याप्रकरणी, सोनगीर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार दिनांक 19/011/2026 रोजी अभय नथु कोर, कृषी अधिकारी सा. पंचायत समिती शहादा व विशाल वाकचौरे, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, शहादा यांना शहादा येथून अनुदानीत युरीया भरलेली टाटा कंपनीची मालवाहू बंद कंटेनर असलेली लाल रंगाची मालवाहू गाडी दोंडाईच्याचे दिशेने निघालेली आहे अशी गोपनीय माहिती मिळाली होती. त्या आधारे त्यांनी सदर मालवाहू गाडीचा पाठलाग केला असता संबंधित चालकाने ती गाडी शहादा हद्दीतून दोंडाईचाच्या मार्गे लामकाणी या.धुळेच्या दिशेने दामटली. तेव्हा अभय कोर व विशाल वाकचौरे यांनी धुळे पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा धुळे तालुक्याचे खत नरीक्षक जगदीश सदाशिव बोराळे यांना त्या गाडीची माहिती दिली. त्यावरून त्यांनी सोनगीर पोलीस स्टेशनचे गस्तीवरील उपनिरीक्षक किरणसींग भिमसींग राजपूत व पो.कॉ. नितीन जाधव यांना घेवुन लामाकाणी चौफुली गाठली. तेव्हा ती टाटा कंपनीची बंदीस्त कंर्टेनर असलेर्ली लाल रंगाची मालवाहू गाडी क्र.एम.एच. 48 सी. क्यु. 9457 येताच तपासणी करण्यात आली. फिर्यादीत देण्यात आलेल्या माहितीनुसार युरीया पॅकींग 45 किलो, नग-270*250 एकूण रूपये 67500/- व त्यावर मे. अब्दुल्ला भाई युसुफजी अॅण्ड सन्स यांचे स्वाक्षरी आढळून आली सदर चालकास कंटेनर मधील माल उघडण्यास सांगीतले असता त्याने कंटेनरला असलेले कुलूप उघडून दाखविले त्याची पंचांसमक्ष पाहणी केली असता त्यात गुजरात नर्मदा व्हॅली फर्टीलायझर्स अॅण्ड केमीकल लिमीटेड, नर्मदा नगर, 392015 जिल्हा भरूच गुजरात असे उत्पादीत केपनीचे नाव आढळून आले त्यावर प्रती गोणी किंमत 1498.60/- रू. शासकीय भारत सरकार द्वारा सबसीडी 1232.10/- रूपये अधिकतम खुदरा मुल्य (सभी करोसहीत-266.50/- रूपये) असे आढळून आले त्यावर बॅच क्र.26/11/03 उत्पादन तिथी नोव्हे-2026 आढळून आले. सोनगीर पोलिसांनी वाहनासह हा सर्व युरीया साठा जप्त केला.
शहाद्यातील कनेक्शन?
 अधिक झाडाझडती घेतली असता चालकाने पोलिसांना सांगितले की, सदर युरीया मे. अब्दुल्ला भाई युसुफजी अॅण्ड सन्स, साईबाबा मंदीर समोर, शहादा येथून गाडीत भरला असून तो मी आर. आर. ट्रान्सपोर्ट चे मालक राजेंद्र राठोड यांच्या सांगणेवरून धुळेचे दिशेने नेत होतो, धुळे येथे आलेवर पुढे कोठे जावयाचे आहे या बाबत मालक राजेंद्र राठोड हे सांगणार होते असे त्याने पंचासमक्ष सांगीतले. त्याने मे. अब्दुल्ला भाई युसुफजी अॅण्ड सन्स नाव असलेले डिलेव्हरी मेमो क्र.424 दिनांक 19/11/2026 दाखविले. त्यावर महाविर कृषी सेवा केंद्र खांडबारा असे लिहलिलेले आढळले. या मालाचे नमुने घेण्यात आले असून यापैकी एक नमुना प्रयोग शाळेत परीक्षणासाठी, दुसरा नमुना विभागीय कृषी सह संचालक नाशिक विभाग, नाशिक व तीसरा नमुना फिर्याद सोबत देण्यात आला.
संशयितांना 3 दिवस पोलिस कोठडी
दरम्यान, धुळे पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा धुळे तालुक्याचे खत नरीक्षक जगदीश सदाशिव बोराळे यांनी फिर्याद दिल्यानंतर संशयित आरोपी म्हणून मे. अब्दुल्लाभाई युसुफजी ॲण्ड सन्स,शहादा चे मालक मादभाई, राजेंद्र राठोड, वसई विरार, नवी मुंबई, महावीर कृषी सेवा केंद्र खांडबारा चे मालक जितू सुरेश परदेशी, रा.खांडबारा आणि कंटेनर चालक मो. ताहीर तसउवर अहमद, रा. जमालुद्दीनपूर, खुटहन, जौनपूर (उत्तर प्रदेश) यांच्या विरोधात काल दिनांक 20 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सोनगीर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!